हज यात्रेच्या समाप्तीनंतरही अतिरिक्त शुल्काची आकारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:00 AM2018-12-04T06:00:59+5:302018-12-04T06:01:09+5:30

२०१८ मधील हज यात्रा समाप्त होऊन २०१९च्या हज यात्रेची घोषणा झाल्यानंतरही, केंद्रीय हज समितीतर्फे २०१८च्या हज यात्रेकरूंना अतिरिक्त शुल्क भरण्याचे पत्र पाठविण्यात येत आहे.

Extra charges for the Haj pilgrimage | हज यात्रेच्या समाप्तीनंतरही अतिरिक्त शुल्काची आकारणी

हज यात्रेच्या समाप्तीनंतरही अतिरिक्त शुल्काची आकारणी

Next

- खलील गिरकर
मुंबई : २०१८ मधील हज यात्रा समाप्त होऊन २०१९च्या हज यात्रेची घोषणा झाल्यानंतरही, केंद्रीय हज समितीतर्फे २०१८च्या हज यात्रेकरूंना अतिरिक्त शुल्क भरण्याचे पत्र पाठविण्यात येत आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंमध्ये नाराजी आहे.
२०१८ मध्ये झालेल्या हज यात्रेची प्रक्रिया २०१७ पासून सुरू झाली होती. १ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत हज यात्रा पार पडली. हज यात्रेसाठी २० ठिकाणांहून यात्रेसाठी विमानांची सेवा उपलब्ध होती. १ लाख २८ हजार ५७७ यात्रेकरूंनी या सेवेचा लाभ घेतला. मात्र, यंदा भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत नेहमीपेक्षा वधारल्याने, यात्रेकरूंना अतिरिक्त शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई केंद्रातून गेलेल्या २०१८च्या हज यात्रेकरूंना ४,६७० तर, गुवाहाटी केंद्रातून गेलेल्या प्रवाशांना सर्वाधिक म्हणजे ९,०५० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हज समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हज समिती ही ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करणारी संस्था असून, केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली त्याचे पूर्ण काम चालते. डॉलरच्या दरातील चढ-उताराप्रमाणे समिती यात्रेकरूंकडून खर्चासाठी शुल्क आकारते. यंदा डॉलरच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने, जास्त खर्च झाल्याने अतिरिक्त शुल्क आकारले आहे. यात्रेकरूंनी हे शुल्क समितीला द्यावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, ते न भरल्यास कोणतीही कारवाई होणार नाही. शुल्क भरावे की भरू नये, याचा निर्णय यात्रेकरूंच्या नैतिकतेवर अवलंबून आहे. विविध सुविधांसाठी समितीने यात्रेकरूंकडून आगावू शुल्क घेतले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेकांनी सुविधांचा लाभ घेतला नाही, अशा ८७ हजार यात्रेकरूंचे ९१ कोटी रुपये समितीने परत केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
>हज समितीकडून फसवणूक
२०१९च्या हज यात्रेची घोषणा करताना केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्यानंतरही अतिरिक्त शुल्क आकारण्याची पत्रे घरी पाठविल्याने यात्रेकरूंमध्ये नाराजी आहे. हज समितीने यात्रेकरूंसोबत केलेली ही फसवणूक असल्याचा आरोप मुंबईतील यात्रेकरू इम्रान मुल्ला यांनी केला. समितीचा कारभार मनमानी पद्धतीने चालविला जात असून, असे प्रकार रोखण्याची गरज असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.
>... म्हणूनच अतिरिक्त शुल्काची आकारणी
आंतरराष्टÑीय प्रवासांतर्गत विमान प्रवासासाठीच्या शुल्काची आकारणी ही जागतिक चलन बाजारातील डॉलरच्या मूल्यावर अवलंबून असते. परिणामी, रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वधरल्यास तिकीट शुल्कातही वाढ होते.
रुपयाच्या तुलनेत डॉलर जास्त वधारल्यामुळेच २०१८च्या हज यात्रेकरूंना अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात आली आहे. मात्र, ते न भरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे हज समितीच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Extra charges for the Haj pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.