मुंबईत स्थापन होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:56 AM2018-12-21T06:56:13+5:302018-12-21T06:57:06+5:30

राज्य मंत्रिमंडळाची बैठक : राज्यातील पहिल्या समूह विद्यापीठाला मान्यता

Dr will be set up in Mumbai Homi Bhabha University | मुंबईत स्थापन होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ

मुंबईत स्थापन होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ

googlenewsNext

मुंबई : राज्यातील पहिल्या समूह विद्यापीठाला गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबईतील चार महाविद्यालयांना एकत्रित करून डॉ. होमी भाभा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या विद्यापीठात चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शाखांमधील अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार डॉ. होमी भाभा विद्यापीठात मुंबईतील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स) या मुख्य विद्यालयासह सिडनहॅम कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय (बीएड कॉलेज) या चार महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे येथील विद्यार्थ्यांना चॉइस बेस्ड के्रडिट सिस्टीमनुसार वेगवेगळ्या शाखेतील आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडता येणार आहेत. सिडनहॅममधील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला कला विषयासाठी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे, तसेच त्याला विज्ञान संस्थेत विज्ञान शाखेचा विषयही घेता येणार आहे. या पद्धतीत ६५ क्रेडिट असलेला मुख्य विषय असेल तर उर्वरित ३५ क्रेडिट इतर विषयांमध्ये घेता येऊ शकतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान (रुसा)च्या माध्यमातून देशभरात चार महाविद्यालयांचे मिळून एक विद्यापीठ स्थापन केले जात आहे. रुसाच्या धोरणानुसार तयार होणारे होमी भाभा विद्यापीठ राज्यातील पहिले आणि देशातील तिसरे समूह विद्यापीठ आहे. होमी भाभा विद्यापीठाला मान्यता देतानाच त्यासाठी आवश्यक पदांना आणि खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या समूह विद्यापीठातील चारही अनुदानित महाविद्यालयांचे अनुदान अथवा सेवाशर्ती तशाच राहणार आहेत. त्यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वा अन्य लाभ तसेच चालू राहतील. यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अशा पद्धतीने चार कॉलेज एकत्र करून विविध विद्याशाखांचा त्यामध्ये समावेश करून समूह विद्यापीठाची स्थापना केल्यास, त्याचा शैक्षणिक लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मोठ्या विद्यापीठांवरील ताण कमी होईल शिवाय जागतिक स्तरावरील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे या विद्यापीठांना शक्य होणार आहे. कौशल्य विकासावर भर असणाºया या विद्यापीठांमुळे गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याचा दावाही तावडे यांनी या वेळी केला.
 

Web Title: Dr will be set up in Mumbai Homi Bhabha University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.