मुंबईमध्ये मनसेच्या मतांची विभागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:19 AM2019-04-30T02:19:11+5:302019-04-30T06:34:54+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीला मते न देण्याचे आवाहन करीत जोरदार सभा घेतल्या पण मुंबईत राज यांच्या आवाहनाला मनसैनिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला नाही.

Division of MNS votes in Mumbai | मुंबईमध्ये मनसेच्या मतांची विभागणी

मुंबईमध्ये मनसेच्या मतांची विभागणी

Next

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीला मते न देण्याचे आवाहन करीत जोरदार सभा घेतल्या पण मुंबईत राज यांच्या आवाहनाला मनसैनिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला नाही. मनसेच्या मतांची आघाडी आणि युतीमध्ये विभागणी झाली असे मतदानादरम्यान फेरफटका मारला असता जाणवले.

दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे मुंबईतील किमान दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसेल असे दिसते. ईशान्य मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरसह काही दलित वस्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निहारिका खोंडले यांना चांगली मते मिळाल्याचे जाणवत होते. आघाडीचे कार्यकर्ते उत्साहाने तसे सांगत होते. स्वत: खोंडले या धनगर समाजाच्या असल्याने या मतदारसंघातील धनगर वस्ती त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत होते. दलित वस्त्यांमध्ये खोंडले यांच्यानंतर राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत होते. या मतदारसंघातील मुस्लिम वस्त्यांमध्ये मात्र संजय पाटील यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले असा अंदाज आहे. तिथे फारतर दहा टक्के मते वंचित बहुजन आघाडीला पडतील, असे पाटील यांचे कार्यकर्ते सांगत होते. 

याच मतदारसंघात मनसेच्या मतांचे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये विभाजन झाल्याचे जाणवले. ही विभागणी ६०:४० असावी असा अंदाज आहे. मनसेत असलेले येथील नगरसेवक शिवसेनेत गेल्याने हा फरक पडला. तसेच भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी असलेले वैयक्तिक संबंध कामास पडले, असे म्हटले जाते.

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी मुख्य लढत होती. मनसेची मते या दोघांमध्येही विभागली गेली. मनसैनिक हे पूर्वीचे शिवसैनिकच. त्यांचे आजही शिवसेना-भाजपतील स्थानिक पदाधिकारी, आमदार, नगरसेवकांशी चांगले संबंध आहेत. याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे धनाढ्य उमेदवार संजय भोसले यांनी काही प्रमाणात दलित मते घेतल्याचे कार्यकर्ते, मतदारांशी बोलण्यातून जाणवत होते. भोसले यांनी घेतलेली मते काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना फटका देऊ शकतात.

बाजूच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारात तर होतेच पण आज मतदानासाठी मतदारांना बाहेर काढण्यातही सक्रिय दिसले. तरीही मनसेची ६० टक्के मते काँग्रेसकडे वळतील तर उर्वरित ४० टक्के मते आम्हाला मिळतील, असा दावा भाजपचे नेते करीत होते. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या लढतीत मनसेने मातोंडकर यांना चांगली साथ दिली. उत्तर-पश्चिम मुंबईत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम या लढतीत मनसेच्या मतांचा जादा टक्का निरुपम यांच्याकडे वळला पण तेथील लढतीला मराठी विरुद्ध बिहारी असे स्वरुप असल्याने बऱ्याच मनसैनिकांनी त्यांचे वजन कीर्तीकर यांच्या पारड्यात टाकले असे म्हटले जाते.

मनसैनिकांनी दिली ‘नोटा’ला पसंती?
मनसेचा उमेदवार एकाही मतदारसंघात नव्हता. राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या विरोधात मतदान करायला सांगितले होते. तो आदेश आम्ही पाळला; पण आम्ही आमच्या आयुष्यात कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीला मते देऊ शकत नाही, असे काही मनसे कार्यकर्ते सांगत होते. त्यांनी ‘नोटा’ला पसंती दिल्याचे त्यांच्याशी चर्चेतून जाणवले.

Web Title: Division of MNS votes in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.