आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लीम नेत्यांमध्ये मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 06:07 AM2018-08-22T06:07:10+5:302018-08-22T06:07:28+5:30

मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरून समाजाचा एकत्रित लढा उभारण्याची गरज असताना, यामध्येदेखील राजकीय फायदे उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Differences among Muslim leaders on reservation demand | आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लीम नेत्यांमध्ये मतभेद

आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लीम नेत्यांमध्ये मतभेद

Next

- खलील गिरकर

मुंबई : मुस्लीमआरक्षणाच्या मागणीवरून समाजाचा एकत्रित लढा उभारण्याची गरज असताना, यामध्येदेखील राजकीय फायदे उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुस्लीम क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दोन बैठका पार पडल्यानंतर, आता मुस्लीम आरक्षण संयुक्त कृती समितीने मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. विविध नेत्यांकडून स्वतंत्र चूल मांडली जात असल्याने, समाजामध्ये नाराजीची भावना आहे.
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या पुढाकाराने, मुस्लीम समाजातील विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, मौलाना, विचारवंत यांच्या सहभागाने मुस्लीम क्रांती मोर्चा कार्यरत झाला होता. मात्र, आता मुंबईतील काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी पुुढाकार घेऊन, कृती समितीतर्फे २६ आॅगस्टला अंजुमन इस्लामच्या करिमी लायब्ररीमध्ये बैठक आयोजित केली आहे. राज्यातील मुस्लीम समाजाला एकत्र करून, विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन दलवाई यांनी केले आहे. पुण्यात मुस्लीम मूक मोर्चाच्या माध्यमातून या मागणीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व मुस्लीम समाजातील मान्यवरांचा समावेश असलेल्या मुस्लीम क्रांती मोर्चाच्या माध्यमातून, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात असताना, इतर सर्व नेत्यांनी व संघटनांनी यामध्ये सहभागी होऊन एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मात्र, त्याऐवजी स्वतंत्र चूल मांडणे चुकीची असल्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार आरिफ नसीम खान यांनी सांगितले.
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनीदेखील या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. इस्लाम जिमखानामध्ये झालेल्या मुस्लीम क्रांती मोर्चाच्या बैठकीला आमदार अबू आझमी, आमदार आरिफ खान, आमदार वारीस पठाण व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आरक्षणासाठी सर्व नेते, संघटनांनी एकत्र येणे गरजचे आहे. एकत्रितपणे आवाज उठवला तरच आरक्षणाची मागणी मान्य होऊ शकते. मात्र त्याऐवजी स्वतंत्र चूल मांडणे चुकीची असल्याची भावना मुस्लीम बांधवांमध्ये आहे.

Web Title: Differences among Muslim leaders on reservation demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.