डीजीसीएने बी ७३७ मॅक्स विमानांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:54 AM2019-03-12T05:54:31+5:302019-03-12T05:54:58+5:30

...अन्यथा उड्डाणास मनाई; इथिओपिया विमान दुर्घटनेची घेतली दखल

DGCA has asked for information about the safety of the B737 Max aircraft | डीजीसीएने बी ७३७ मॅक्स विमानांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागवली

डीजीसीएने बी ७३७ मॅक्स विमानांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागवली

Next

मुंबई : इथिओपिया एअरलाइन्सचे बोइंग ७३७ मॅक्स प्रकारचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानातील सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अशा प्रकारची विमाने वापरणाऱ्या जेट एअरवेज, स्पाइसजेट व विमान कंपनी बोइंगकडून माहिती मागवली. तसेच याबाबत सुरक्षेच्या उपाययोजना जाहीर केल्या. या उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही तर उड्डाण करण्यास मनाई केली आहे.

इथिओपिया, चीन व इंडोनेशियाने या प्रकारच्या विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय या अपघातानंतर घेतला आहे. या विमानाच्या मुख्य वैमानिकाला १ हजार तासांचा तर सहवैमानिकाला ५०० तासांचा अनुभव असावा, ३ डिसेंबर २०१८ रोजी डीजीसीए ने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन या विमानातील क्रू सदस्यांना प्रशिक्षण देण्यात यावे अशा विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींचे पालन सोमवारी मध्यरात्रीपासून करावे अन्यथा उड्डाण करण्यास परवानगी मिळणार नाही, असे डीजीसीए ने स्पष्ट केले आहे.

२९ आॅक्टोबर २०१८ रोजी याच प्रकारच्या विमानाच्या जकार्ता येथे झालेल्या अपघातात १८९ प्रवाशांचा मृत्यु झाला होता. जेट एअरवेजकडील सर्व ५ बी ७३७ मॅक्स विमानांचे भाडे भरलेले नसल्याने त्यांची उड्डाणे रद्द करून त्यांना जमिनीवर ठेवण्यात आले आहे. स्पाइसजेटच्या ताफ्यात या प्रकारातील १२ विमाने सध्या वापरात आहेत. डीजीसीएचे महासंचालक बी.एस. भुल्लर यांनी याबाबत बोइंगकडून अधिक माहिती मागवण्यात आल्याची माहिती दिली. गरज भासल्यास अधिक उपाययोजना आखण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विमान खाली येण्यापासून रोखण्यासाठी असलेल्या एमसीएएस या सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या बिघाडामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आॅक्टोबरमध्ये जकार्ता अपघातानंतर डीजीसीएने जेट व स्पाइसजेटला अशा विमानांमध्ये हे सॉफ्टवेअर काम करत नसल्यास त्वरित जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याचे निर्देश दिले होते.

त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश
केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून याबाबत डीजीसीए व हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे प्रभू यांनी टिष्ट्वटरद्वारे जाहीर केले.. बोइंगने या अपघाताची चौकशी करण्यासाठी अपघातस्थळी जाऊन इथिओपियन चौकशी समितीला तांत्रिक साहाय्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: DGCA has asked for information about the safety of the B737 Max aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.