मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्रांत चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:25 AM2019-05-02T05:25:31+5:302019-05-02T05:25:45+5:30

तीन वर्षांत १५ हजार तक्रारी; निष्काळजीपणाचा सिनेट सदस्याचा आरोप

Degree Certificate from the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्रांत चुका

मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्रांत चुका

googlenewsNext

सीमा महांगडे

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या त्यासंबंधी असलेल्या तक्रारींचा पाढा संपता संपत नाही आणि विद्यापीठ चुकीची महिती पुरविताना थांबत नाही. याचेच उदाहरण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या सिनेट बैठकीत २०१६ ते २०१८च्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे आपल्या पदवी प्रमाणपत्रांबाबत केलेल्या तक्रारींची संख्या तब्ब्ल १५ हजार ११६ असल्याची माहिती सिनेट सदस्य राजे गुलाबराव यांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत विद्यापीठाने दिली. तसेच आतापर्यंत सर्व तक्रारींचे निरसन करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. मात्र मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या तक्रारी पाहता विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांबाबत विद्यापीठाकडून निष्काळजीपणा करण्यात येत असल्याचा आरोप सिनेट सदस्य राजे गुलाबराव यांनी केला आहे.

२४ आणि २५ एप्रिल रोजी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत सिनेट सदस्य राजे गुलाबराव यांनी २०१६ ते २०१८च्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या मुंबई विद्यापीठाकडे आलेल्या तक्रारींची माहिती विद्यापीठाकडे मागितली होती. विद्यापीठाने गुणपत्रिका, प्रवेशपत्र, पदवी प्रमाणपत्रे यामध्ये झालेल्या चुका आणि विद्यार्थ्यांच्या त्यासंदर्भातील तक्रारींची माहिती दिली. पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रवेशपत्रांमध्येही चुका असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.

२०१६ ते २०१८ मध्ये गुणपत्रिकांच्या दोनच तक्रारी आल्याची माहिती विद्यापीठाने दिली. त्यातील एकाचे निरसन करण्यात विद्यापीठाला यश मिळाले आहे. तर, प्रवेशपत्रात झालेल्या चुकांच्या एकूण ९२६ तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. त्यातील सर्व म्हणजे ९२६ तक्रारी सोडविण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. मात्र सिनेट सदस्य आणि बुक्टो या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजे गुलाबराव यांनी विद्यापीठाने दिलेल्या माहितीवर असमाधान व्यक्त करीत मुंबई विद्यापीठ खोटी माहिती देत असल्याचा दावा केला आहे. गुणपत्रिका आणि त्यातील चुका यांची संख्या विद्यापीठाने दिलेल्या माहितीतील आकड्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असून त्याचा पुरावाही आपल्याकडे असल्याचा दावा केला.

‘गुणपत्रिकेसंदर्भातील माहितीत तफावत’
२०१६ आणि २०१७ या वर्षात तर पेपर तपासणीसाठीच्या ऑनलाइन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीमुळे मोठा घोळ झाला तरी त्या वर्षी गुणपत्रिकेबाबत एकही तक्रार नसल्याचे मुंबई विद्यापीठाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि विद्यापीठाने पुरविलेली माहिती यात तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Degree Certificate from the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.