क्रिस्टल टॉवर आगीस रहिवासीच जबाबदार; विकासकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:28 AM2018-08-24T05:28:05+5:302018-08-24T05:28:30+5:30

‘क्रिस्टल’चा विकासक व आरोपी अब्दुल रझ्झाक इस्माईल सुपारीवाला याने आग प्रकरणी इमारतीतील रहिवासी व महापालिकेला जबाबदार ठरविले

Crystal tower fire dwellers are responsible; Developer Claims | क्रिस्टल टॉवर आगीस रहिवासीच जबाबदार; विकासकाचा दावा

क्रिस्टल टॉवर आगीस रहिवासीच जबाबदार; विकासकाचा दावा

Next

मुंबई : क्रिस्टल टॉवरमधील रहिवाशांना २०१२पासून सोसायटी स्थापनेची सूचना करूनही त्यांनी सोसायटीची स्थापना केली नाही. इमारतीच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी तेथील रहिवाशांची आहे. तसेच मुंबई महापालिकेकडे २०१२पासून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) व अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अद्याप त्यांनी दिले नाही, असा युक्तिवाद भोईवाडा न्यायालयात करत ‘क्रिस्टल’चा विकासक व आरोपी अब्दुल रझ्झाक इस्माईल सुपारीवाला याने आग प्रकरणी इमारतीतील रहिवासी व महापालिकेला जबाबदार ठरविले.
क्रिस्टल टॉवरला आग लागल्यानंतर पोलिसांनी सुपारीवाला याला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३६ (लोकांचा जीव धोक्यात घालणे), ३३७ व ३३८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्याशिवाय ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड लाइफ सेफ्टी अ‍ॅक्ट २००६’ अंतर्गतही त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आॅक्टोबर २०१६मध्ये महापालिकेने विकासकाला नोटीस बजावली. तर येथील ५८ रहिवाशांनाही नोटीस बजावून सात दिवसांत फ्लॅट खाली करण्यास सांगितले होते. मात्र, या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे, असे महापालिकेने बुधवारी सांगितले. ज्या मजल्यावर आग लागली त्या मजल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस कोठडीत २७ आॅगस्टपर्यंत वाढ
बुधवारी सकाळी परळ पूर्व येथील हिंदमाता येथील १७ मजली क्रिस्टल टॉवरच्या १२व्या मजल्यावर आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झाले. या प्रकरणी विकासक सुपारीवाला याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी भोईवाडा न्यायालयाने विकासकाच्या पोलीस कोठडीत २७ आॅगस्टपर्यंत वाढ केली.

Web Title: Crystal tower fire dwellers are responsible; Developer Claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.