‘मुंबई’त ‘गर्दी’दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:35 AM2018-11-12T06:35:09+5:302018-11-12T06:35:37+5:30

पर्यटक लोकलकोंडीत : दिवाळीच्या सलग सुट्या आणि मेगाब्लॉकचा फटका

'Crowd' in Mumbai! | ‘मुंबई’त ‘गर्दी’दर्शन!

‘मुंबई’त ‘गर्दी’दर्शन!

Next

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीला वीकएण्डची जोड मिळाल्याने मुंबई दर्शनासाठी ठिकठिकाणच्या प्रवाशांची रविवारी प्रचंड गर्दी झाली खरी, पण मेगाब्लॉक आणि रविवारच्या वेळापत्रकामुळे गाड्यांना खच्चून भरल्या होत्या त्यामुळे सहकुटुंब फिरणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. पर्यटकांना मुंबईतील विविध स्थळांसोबतच मुंबईच्या जीवघेण्या गर्दीचे दर्शनही घडले.

सलग सुट्टयांचा शेवटचा रविवार असल्याने बहुतांश पर्यटकांनी, मुंबई-ठाण्यात नातलगांकडे आलेल्यांनी मुंबई दर्शनाला पसंती दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गेट वे आॅफ इंडिया, ताज हॉटेल, तारापोरवाला मत्स्यालय, हॅँगिंग गार्डन, भायखळ््याच्या जिजामाता उद्यानात पर्यटकांची गर्दी होती. पेंग्विन पाहणे हा तेथील आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. शिवाय फोर्ट परिसरातील हेरिटेज वास्तू पाहण्यासही पर्यटकांनी पसंती दिली. त्यामुळे त्या भागातील बस, शेअर टॅक्सीसाठी दिवसभर झुंबड उडाली होती.

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक आणि रविवारचे वेळापत्रक यामुळे नेहमीच्या तुलनेत उपनगरी मार्गावर कमी लोकल फेºया चालवण्यात आल्या. त्याही वेळेत उपलब्ध नसल्याने कुर्ला, दादर, भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होती. सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर लोकल उपलब्ध होत असल्यामुळे मिळेल ती लोकल पकडण्याचा अट्टहास आणि लोकल प्रवासाची सवय नसल्याने प्रत्येक गाडी गर्दीने भरली होती. पश्चिम रेल्वेवर जंबोब्लॉक नसला, तरी रविवार वेळापत्रकामुळे तेथील लोकल फेºयांची संख्याही कमी होती. परिणामी, तेथील प्रवाशांनाही काही काळ लोकलसाठी ताटकळत रहावे लागत होते. मुंबई दर्शनासाठी भाऊबीजेनंतर प्रवाशांचा ओढा वाढला. शहरातील मेट्रो कामांमुळे मुंबई दर्शनासाठी रस्तामार्गे निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले होते. शिवाय गेट वे, म्हातारीचा बूट, गिरगाव चौपाटी, मरिन, नरिमन पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु होती. त्यात उन्हाचा तडाखा असल्याने पर्यटक कंटाळून गेल्याची माहिती दादर येथील खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी दिली. पूर्व आणि पश्चिम दु्रतगती मार्गावरही विविध ठिकाणी वाहने धीम्या गतीने सरकत असल्याचे दिसून आले. गर्दीचा फायदा उठवत सीएसएमटी ते गेट वे या मार्गावर धावणाºया शेअर टॅक्सीचालकांनी जादा भाडे आकारल्याचा आरोप ही काही पर्यटकांनी केला. एरव्ही रविवारी मेट्रो, मोनोला तुलनेने कमी गर्दी असते. मात्र या गाड्यांतील प्रवासाचा अनुभव घेणाºया पर्यटकांमुळे त्या फेºयाही गर्दीने ओसंडत होत्या.

गेट वे, मत्स्यालय, चौपाट्याही फुलल्या

गेट वेचे प्रांगण दिवसभर गर्दीने फुलले होते. तेथील पर्यटक फेरीबोटी, एलिफंटाला जाणाºया बोटींसाठीही रांगा लागल्या होत्या. तारापोरवाला मत्स्यालय पाहण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिकवेळ लागत असल्याने तेथील रांगाही दिवसभर कायम होत्या. जिजामाता उद्यानात पूर्वीइतके प्राणी नसले, तरी पेंग्विन पाहण्यासाठी गर्दी होती. माहीमचे निसर्ग उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान- तेथील विविध सफारी, बोटींगसाठीही भरपूर गर्दी झाली होती.

Web Title: 'Crowd' in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई