क्रॉफर्ड मार्केटचा होणार मॉल; पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या वर्षी खुले होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 08:50 AM2023-05-26T08:50:47+5:302023-05-26T08:50:56+5:30

क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासाला एप्रिल २०१८ मध्ये स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली होती.

Crawford Market to become mall; The final phase of the redevelopment will open next year | क्रॉफर्ड मार्केटचा होणार मॉल; पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या वर्षी खुले होणार

क्रॉफर्ड मार्केटचा होणार मॉल; पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात, पुढच्या वर्षी खुले होणार

googlenewsNext

- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुरातन वारसा लाभलेली ब्रिटीशकालीन महात्मा फुले मंडईची नवीन वातानुकूलित इमारतीचा पुनर्विकास पालिकेकडून केव्हा पूर्ण होणार आणि तिथल्या परवानगीधारक गाळेधारकांसाठी केव्हा खुली होणार याच प्रतीक्षेत मुंबईकर आहेत. दरम्यान, विविध सुविधांयुक्त ही इमारत बांधली जात असून मंडईचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंडईतील सुमारे १३७ फळ विक्रेत्यांना मंडईजवळच्या बाजूच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्यात आली आहे. २०२४ पर्यंत मंडई खुली होईल, असे सांगण्यात येत आहे. या मंडईचे रुपडे पालटले जाणार असून अद्ययावत सुविधांमुळे आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्यावर कसे वाटते तसे या मंडईत गेल्यावर ग्राहकांना जाणवणार आहे.   

क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासाला एप्रिल २०१८ मध्ये स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली होती. तळमजली पत्र्याची शेड असलेल्या मुख्य बाजार इमारतीची पुनर्रचना करण्यासाठी टप्पा दोन अंतर्गत कंत्राटदारास पावसाळ्यासहित ३६ महिन्यांचा कालावधी दिला होता. हे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात जुलै २०२० पासून कामाला सुरुवात झाली. कोरोना व अन्य तांत्रिक कारणांमुळे काम दीड वर्षांहून अधिक काळ रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एप्रिल २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य कंत्राटदाराला दिले होते. मात्र, नवीन डेडलाइननुसार २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले.

सुविधा काय?
 मंडईच्या मध्यभागी ६,७४६.७७ चौरस मीटर क्षेत्रफळावर मनोरंजन मैदानाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात कॅफेटेरीया, छोटेखानी बगिचा, कारंजे बसण्याच्या जागा यांचा समावेश असेल.
 उद्यानामध्ये हिरवळीसोबतच काही निवडक झाडांची लागवडही करण्यात येणार आहे.

खर्च किती वाढला?
क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासाचे काम कोरोनाचे संकट व इतर कारणांमुळे तब्बल १८ महिने रखडले. या पार्श्वभूमीवर क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचा खर्च तब्बल ४८ कोटींनी वाढला आहे. पालिका प्रशासनाचे पुनर्विकास कामांसाठीचे मूळ कंत्राट ३१४ कोटींचे होते. मात्र, काम रखडल्याने हा खर्च आता ३६२ कोटींवर पोहोचला आहे.

पुनर्विकासाला उशीर का?
पालिकेचा पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेमुळे कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश देण्यासाठी सहा महिने उशीर झाला. 
तसेच गाळेधारकांच्या पुनर्वसनानंतर इमारतीच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले. 
दरम्यान, इमारतीच्या ब्लॉक चारच्या फाउंडेशनचे काम सुरू असताना खोदकामाच्या वेळी बेसॉल्टसारखा हार्ड रॉक लागल्याने खोदकाम कठीण झाले आणि पायासाठी विलंब झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कसे असणार नवीन क्रॉफर्ड मार्केट?

 महात्मा फुले मंडई २२,३९४.६२ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभी असून त्यापैकी ६,६८७ चौरस मीटर क्षेत्रफळावर इंग्रजी भाषेतील ‘एल’ आद्याक्षराच्या आकारात मंडईतील पुरातन वारसा वास्तू उभी आहे. 
 या वास्तूला कोठेही धक्का न लावता ७,६००.१७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा पुनर्विकास होणार असून पुनर्विकासात तब्बल १९,७३७.७० बांधकाम प्रस्तावित आहे. यामध्ये चार ब्लॉक्समध्ये काम करण्यात येणार असून तीन मजली वातानुकूलित इमारत बांधली जाणार आहे.
 ब्लॉक १ ही हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आल्याने तिथे पुनर्विकास होणार नसून केवळ डागडुजी होईल.
 ब्लॉक १ चे बांधकाम पूर्ण झाले असून तिथे काही फळ विक्रेत्यांना तात्पुरती जागा दिली आहे. ही जागा जुन्या जागेतील परवानाधारक फळ विक्रेते, भाजी विक्रेते, पक्षी विक्रेत्यांसाठी ठेवली आहे. तसेच त्याच्यावरील मजल्यावर त्यांची काही कार्यालयेही आहेत.
 ब्लॉक ३ मांसाहारी विक्रेत्यांचा समावेश असून त्यांना 
जागा देण्यात येईल. यामध्ये दादरमधील मासे विक्रेत्यांचाही समावेश आहे.
 ब्लॉक ४ मधील फाउंडेशनचे काम सुरू असून लवकरच वरील बांधकामाला सुरुवात होईल.

कोरोना आणि त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाला विलंब झाला. मात्र, आता या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली आहे. एकदा चौथ्या ब्लॉकचे फाउंडेशनचे काम पूर्ण झाले की त्यानंतर इतर कामे शक्य तितक्या लवकर होऊन परवाना असलेल्या गाळेधारकांना मार्केटमधील जागा उपलब्ध होईल.
- प्रकाश रसाळ, सहायक आयुक्त (बाजार)

Web Title: Crawford Market to become mall; The final phase of the redevelopment will open next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई