मुंबई, ठाण्यात संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:51 AM2018-08-08T05:51:55+5:302018-08-08T05:52:13+5:30

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला मंगळवारी पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Composite response in Mumbai, Thane | मुंबई, ठाण्यात संमिश्र प्रतिसाद

मुंबई, ठाण्यात संमिश्र प्रतिसाद

Next

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला मंगळवारी पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रणित संघटनेसह अधिकारी महासंघाने संपातून माघार घेतल्यानंतरही बहुतांश प्रमाणात कार्यालयातील कामकाज ठप्प पडले होते. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांसह परिचारिकाही संपात सहभागी झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
मंत्रालयातील कर्मचारी संपावर असल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली होती. कामकाजाच्या फाइल्स आणण्यापासून बैठकीसाठी चालत जाण्याची वेळ अधिकाºयांवर आली.
शिवसेना संलग्न महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक व औद्योगिकेत्तर कर्मचारी कामगार संघाने संपातून माघार घेतली. त्यामुळे राज्यातील आयटीआय सुरू असल्याचे दिसले. संघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी म्हणाले की, दिवाळीपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात मान्य केले आहे. त्यामुळे संप पुकारण्यात काही अर्थ नव्हता. दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करता येईल.
>पालिका कर्मचारी संपात सहभागी नाहीत
राज्य सरकारच्या धर्तीवर महापालिका कर्मचाºयांनाही सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी मिळणार आहे़ हा लाभ देण्यास पालिका प्रशासन तयार असले, तरी राज्य सरकारच्या कर्मचाºयांप्रमाणेच त्यांची कार्यालयीन वेळ, रजा व इतर सवलतींमध्ये बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे़ पालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करताना, ते जनतेला कोणत्या प्रकारची आणि किती तास सेवा देणार याचे बंधनही त्यांच्यावर असणार आहे. त्यानुसारच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे, पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले़ त्यामुळे पालिका कर्मचारी संपात सहभागी झालेले नाहीत.
>मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात नो एंट्री!
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्ग ३ गटातील एकूण ११२ कर्मचाºयांपैकी केवळ १२ कर्मचारी कामावर उपस्थित होते, तर वर्ग ४ गटातील एकूण ५६ कर्मचाºयांपैकी केवळ २ कर्मचारी कामावर आले होते. वर्ग १ चे २० अधिकारी व वर्ग २ चे २१ अधिकारी कार्यालयात उपस्थित होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर यांनी दिली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मंगळवारी असलेली सुनावणी घेतली. संपाबाबत माहिती मिळाल्याने नागरिकांची गर्दीदेखील नेहमीपेक्षा कमी होती. मात्र, जे नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यांना कर्मचारी नसल्याने घरी परतावे लागले. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती.
>१ हजारपैकी २१६ कर्मचारी हजर
कोकण विभाग भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयाला संपाचा फटका बसला. विभागाचे उपसंचालक खामकर यांनी नियोजित सुनावण्या घेतल्या. मुंबई विभागातील २७८ पैकी २४२ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. पूर्ण कोकण उपसंचालक विभागातील १ हजार ०४९ पैकी ८३३ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने फक्त २१६ कर्मचारी कामावर हजर होते.
>दोन दिवस शाळा बंद
शहरातील अनुदानित शाळांपैकी ५० टक्क्यांहून अधिक शाळा बंद होत्या. हीच परिस्थिती कनिष्ठ महाविद्यालयांचीही होती. बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड टीचर युनियन (बुक्टू)नेही या संपाला पाठिंबा दर्शविल्याचे बुक्टूच्या सरचिटणीस मधू परांजपे यांनी सांगितले. सोमवारी उशिरा संप सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याने मंगळवारी सकाळी काही शाळा/महाविद्यालयांत विद्यार्थी आले होते. त्यांना ८ व ९ आॅगस्टला शाळा/महाविद्यालय बंद राहणार असल्याची सूचना देण्यात आल्या.
>रुग्णालयांना फटका
सरकारी कर्मचाºयांच्या संपात सरकारी रुग्णालयातील नर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉक्टर संपात नसल्याने वैद्यकीय सेवा थोड्या प्रमाणात कोलमडली होती. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी यांना पुढाकार घेतल्याने रुग्णांवरील उपचार पद्धती सुरळीत पार पडल्या. मुलुंडच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग संपात सहभागी झाला होता. या वेळी महिला कर्मचाºयांनी प्रवेशद्वाराबाहेरच बसून शासनाविरुद्ध निदर्शने केली.
>जे. जे. रुग्णालयातील २ हजार ६०० वॉर्डबॉय, परिचारिका संपात सहभागी
जे. जे. रुग्णालयातील २ हजार ६०० वॉर्डबॉय आणि परिचारिका संपात उतरल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक संजय सुरवसे यांनी दिली. सुरवसे म्हणाले की, रुग्णालयातील दैनंदिन शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या असून, आपत्कालीन सेवा सुरू आहेत. २०० एमबीबीएस डॉक्टर आज रुग्णसेवेसाठी हजर आहेत. त्यांच्यासोबतच मेडिकल टीचर्स, शिकाऊ डॉक्टर्स, रहिवासी डॉक्टर्स यांची रुग्णालयात मदत घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले की, सायंकाळपर्यंत एकूण २६ शस्त्रक्रिया झाल्या. याशिवाय ४२ नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आले असून, दिवसभरात २ हजार ९०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांना कंत्राटी कामगार मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. कर्करोगासह अत्यावश्यक सेवा देण्यासाठी काही परिचारिकांसह चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना संपातून वगळल्याची माहिती संपकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली.
>येथे संपाचा फज्जा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई जिल्हा व उपनगर अधीक्षक कार्यालयात संपाचा फारसा परिणाम दिसला नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयातदेखील कर्मचाºयांची उपस्थिती नेहमीप्रमाणे असल्याने कामावर परिणाम झाला नाही.
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी व गुजराती अकादमीचे कामकाजही सुरळीत सुरू होते.
मुंबई शहर विवाह अधिकारी व विवाह निबंधक कार्यालयात कर्मचारी कामावर हजर होते.
>रुईया महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सामूहिक रजेवर
रुईया महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी मंगळवारपासून सामुदायिक सुट्टीवर गेले आहेत. शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्टदरम्यान सामुदायिक सुट्टीवर असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सामुदायिक सुट्टीबाबत रुईया महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य अनुश्री लोकूर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Web Title: Composite response in Mumbai, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार