सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:38 AM2018-08-09T05:38:46+5:302018-08-09T05:38:59+5:30

सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी हटवली असून, ज्या सिनेमागृहांत लोकांना बाहेरील पदार्थ नेण्यापासून अडवतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विधान गेल्याच महिन्यात राज्य सरकारने विधिमंडळात केले होते.

In the cinema hall, ban on outdoor food has been banned | सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी कायम

सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी कायम

Next

मुंबई : सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी हटवली असून, ज्या सिनेमागृहांत लोकांना बाहेरील पदार्थ नेण्यापासून अडवतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विधान गेल्याच महिन्यात राज्य सरकारने विधिमंडळात केले होते. मात्र, राज्य सरकारने अवघ्या सात दिवसांत आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले. सुरक्षेच्या कारणास्तव सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थांवरील बंदी कायम ठेवत आहोत, अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात बुधवारी घेतली. त्यावर न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केले. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेल्यास सुरक्षेला धोका कसा, असा सवाल करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
राज्य सरकारने बुधवारी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने म्हटले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील खाद्यपदार्थ सिनमागृहांत नेण्यावरील बंदी कायम ठेवत आहोत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टनुसार सिनेमागृहांत खाद्यपदार्थ चढ्या दरांत विकल्याबद्दल कारवाई करण्याची तरतूद नाही.
लोकांना बाहेरील पदार्थ सिनेमागृहांत नेण्यास बंदी घालण्याबाबतही कायद्यात तरतूद नाही. सुरक्षेच्या कारणास्तव अन्य सार्वजनिक ठिकाणी लोकांना घरातील किंवा बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यापासून बंदी घातली नाही. मग सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेले, तर सुरक्षेचा काय प्रश्न निर्माण होईल? जर विमानात लोकांना घरातील पदार्थ नेण्यास परवानगी देतात, तर सिनेमागृहांत का नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.
मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ‘सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेणे, हा आपला मूलभूत अधिकार आहे, असा दावा कोणीही करू शकत नाही. सिनेमागृहांतील खाद्यपदार्थांची किंंमत हा व्यवसायिक निर्णय आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही लोकांना मोफत पिण्याच्या पाण्याचे वाटप करतो. विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे विमानात घरचे जेवण नेण्यास परवानगी
आहे.’
>न्यायालयाने खडसावले
सिनेमा दाखविणे हे तुमचे काम आहे, खाद्यपदार्थ विकणे, हे काम नाही. लोकांनी घरातून खाद्यपदार्थ आणल्यास कशाप्रकारे सुरक्षेला धोका आहे, याचे स्पष्टीकरण आम्हाला द्या,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व असोसिएशनला दिले.

Web Title: In the cinema hall, ban on outdoor food has been banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.