‘ढाक्कुमाकुम’ करीत निघणार चोरगोविंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:40 AM2018-08-25T02:40:38+5:302018-08-25T02:41:05+5:30

नारळीपौर्णिमेनिमित्ताने ठिकठिकाणी आयोजन; उमरखाडीचे रौप्य महोत्सवी वर्ष

Chorgovinda will start 'Dhakkumakum' | ‘ढाक्कुमाकुम’ करीत निघणार चोरगोविंदा

‘ढाक्कुमाकुम’ करीत निघणार चोरगोविंदा

Next

मुंबई : अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गोपाळकालासाठी सध्या शहर-उपनगरातील दहीहंडी पथके कसून सराव करीत आहेत. याचीच रंगीत तालीम करण्यासाठी दरवर्षी नारळीपौर्णिमेला चोरगोविंदाचे आयोजन करण्यात येते. म्हणजेच नारळीपौर्णिमेच्या दिवशी शहर-उपनगरात होणाऱ्या सराव शिबिरांत ही पथके जाऊन सहभागी होतात. हा सहभाग म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशीची रंगीत तालीम असते. या प्रथेला ‘चोरगोविंदा’ असे म्हणतात. यंदाही शहर-उपनगरात ठिकठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा दक्षिण मुंबईतील यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोंविदा पथकाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून २५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५पासून सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे सामूहिक पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपयांचे आहे. तर महिलांसाठी रोख रक्कम व आकर्षक चषकही आहे. याशिवाय, येथे पहिल्यांदाच सराव शिबिरात नयन फाउंडेशन यांचे अंध खेळाडूंचे गोविंदा पथक विशेष उपस्थिती लावून थर लावणार आहे.
प्रभादेवी येथील जय ब्राह्मणदेव लोणावळा पिकनिक समितीने प्रभादेवी एस.आर.ए. गृहनिर्माण बिल्डिंग राजाभाऊ देसाई मार्ग, अहुजा टॉवरजवळ सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सराव शिबिराचे आयोजन केले आहे. तर संयुक्त नवी चाळ समिती उत्सव समितीतर्फे लोअर परळ येथील खिमजी नागजी चाळीजवळील पटांगणात सायंकाळी ७ ते १० या वेळेत सराव शिबिर होईल. याचे सामूहिक पारितोषिक ५१ हजारांचे आहे. तर भवानी प्रतिष्ठानने काळबादेवी प्रिन्सेस स्ट्रीट येथे सायंकाळी ७ ते १० या वेळेत सराव शिबिराचे आयोजन केले आहे. यंदा पहिल्यांदाच गोपाळकालाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे सलग ३ ते ४ दिवस सराव शिबिरांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे.

Web Title: Chorgovinda will start 'Dhakkumakum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई