चेंबूर आग दुर्घटना : ख्रिसमस ट्रीची लायटिंग बेतली जीवावर, एसीसह सिलिंडर स्फोटाने होत्याचे नव्हते झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:24 AM2018-12-29T07:24:03+5:302018-12-29T07:24:23+5:30

चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेदरम्यान अडकलेल्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Chembur fire accident: Christmas tree lights were found on Betli life, AC and cylinder blasts | चेंबूर आग दुर्घटना : ख्रिसमस ट्रीची लायटिंग बेतली जीवावर, एसीसह सिलिंडर स्फोटाने होत्याचे नव्हते झाले

चेंबूर आग दुर्घटना : ख्रिसमस ट्रीची लायटिंग बेतली जीवावर, एसीसह सिलिंडर स्फोटाने होत्याचे नव्हते झाले

Next

मुंबई : चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेदरम्यान अडकलेल्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग लागली तेव्हा इमारतीमधील रहिवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला. मात्र उत्तरोत्तर आग वाढत गेली. नंतर झालेले एसीचे स्फोट आणि सिलिंडरचे स्फोट या घटनांनी आगीचे स्वरूप वाढल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, इमारतीलगत पार्क करण्यात आलेल्या गाड्या, वाहणारा वारा इत्यादी कारणांमुळे आग शमविण्यात अनंत अडचणी आल्या.

गेल्या महिनाभरापासून मुंबईत आगीचे सत्र सुरू असून, त्यात आता चेंबूरची भर पडली. टिळकनगरमधील म्हाडाच्या ३५ क्रमांक इमारतीतील ११ व्या मजल्यावरील ११०१ मध्ये राहणाऱ्या मेघपुरीया या ख्रिश्चन कुटुंबीयांमध्ये गतिमंद मुलगा, वडील आणि पत्नी घरात राहत होते. २४ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरात ख्रिसमस ट्री सजविण्यात आला होता. त्याला लायटिंगही केली होती. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरातून जळाल्याचा वास येत होता. बेडरूममधील ख्रिसमस ट्रीला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. बेडरूममधील मुलासह पत्नीला मेघपुरीया यांनी घराबाहेर आणत आरडाओरड केली. समोरच राहणाºया गंजर कुटुंबीयांच्या घराची बेल वाजवली. पुढे त्यांनी खालच्या मजल्यावरील १००१ मध्ये राहणारे सोसायटीचे सदस्य शंकर लंके यांनाही सांगितले. त्यानुसार त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला आणि वरील सर्व मजल्यांवरील रहिवाशांना शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती देण्यासाठी ते गेले. मात्र तोपर्यंत ट्रीवरील पडद्यांनी पेट घेतला. काही वेळातच खाली असलेल्या सोफ्याने पेट घेतला आणि क्षणार्धात आग संपूर्ण घरभर पसरली.

सायंकाळी वारा सुटल्याने वाºयाने ही आग दरवाजापासून बाहेर पसरली. समोरच राहणाºया गंजर कुटुंबीयांची दोन घरे होती. ११०३ आणि ११०४ मध्ये ते राहत होते. त्यांनी नुकतेच दिवाळीनिमित्त संपूर्ण घर फर्निश करून घेतले होते. त्यामध्ये संपूर्ण सजावट लाकडाच्या साहाय्याने केली होती. त्यामुळे आग वाºयाने बाहेर येताच त्यांच्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचली होती. त्यांच्याही संपूर्ण घराने पेट घेतला. दरम्यान, एसीचा स्फोट झाला. या स्फोटात सरला गांगर (५२) आणि लक्ष्मीबेन गांगर (८३) या सासू-सुनेचा खिडकीला आपटून मृत्यू झाला. त्घरातील दोन सिलिंडर्सने पेट घेतल्याने त्यांचा स्फोट झाला आणि आग वरच्या मजल्यावर पसरली.

आजी आजोबांचा गुदमरून मृत्यू

१२ व्या मजल्यावरील १२०३ मध्ये विक्रोळीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मातोश्री सुनीता जोशी (७२) या एकट्याच घरात होत्या. त्यांना घराबाहेर पडताच आले नाही. परिणामी, घरात पसरलेल्या धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच चौदाव्या मजल्यावर राहत असलेल्या जोशी कुटुंबातील भालचंद्र जोशी (७२) आणि सुमन जोशी या आजीआजोबांसह सून आणि लहान मुलगी घरात होती. आगीचे वृत्त समजताच सुनेने मुलीला घेऊन टेरेसवर पळ काढला. तर आजीआजोबा जीव वाचविण्यासाठी वर टेरेसवर जाण्याऐवजी खालच्या तेराव्या मजल्यावरील एक घर उघडे असल्यामुळे तेथे जाऊन थांबले. मात्र आग संपूर्ण मजल्यापर्यंत पोहोचल्याने तेराव्या मजल्यावर धुराचे लोट पसरले आणि आजीआजोबांचा गुदमरून मृत्यू झाला. इमारतीतील अनेक घरांचा अक्षरश: कोळसा झाला. घरातील सामानासह पैसे, पुस्तके असे सर्वच जळून खाक झाले.

पार्किंगचा अडथळा
अग्निशमन दलाला फोन केल्यानंतर काही क्षणांतच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र इमारतीच्या कम्पाउंडमध्ये असलेल्या पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत प्रवेशच करताच आला नाही. त्यामुळे वाहनांच्या काचा फोडून वाहने बाहेर काढण्यात आली. तब्बल अर्ध्या तासाच्या या कसरतीनंतर गाड्यांना आत प्रवेश करता आला. या दरम्यान आग आणखी पसरली.

Web Title: Chembur fire accident: Christmas tree lights were found on Betli life, AC and cylinder blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.