चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:14 PM2018-12-30T13:14:56+5:302018-12-30T13:16:42+5:30

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले.

Chandrasekhar Azad's release from prison, goes to Koregaon-Bhima ... | चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार 

चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार 

Next

मुंबई - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नजर कैदेतून सुटका करण्यात आली आहे. आझाद यांना मालाड येथील हॉटेल मनाली येथे गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. आता, मी कोरेगाव भीमा येथे जाणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जांबोरी मैदानावरील आझाद यांची शनिवारची सभा रद्द झाली आहे.

पोलिसांनी संघटनेचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड, मराठवाडा विभागप्रमुख बलराज दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर, अ‍ॅड. अखिल शाक्य, प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. आझाद यांना भेटण्यासाठी गेलेले विद्रोही कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांनाही पोलिसांनी अटक केली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हॉटेल परिसरात जमावबंदी लागू करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. भीम आर्मीच्या मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी येथील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्य सरकारने चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर, सरफरोशी की समा आज हमारे दिल मे है... असे म्हणत मी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. तसेच मी केवळ चैत्यभूमीवर दर्शनासाठी निघालो होतो. पण, सरकारने मला नजरकैदैत ठेवले. मला  विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करणे, असल्याचेही आझाद यांनी म्हटले आहे. दरम्यान, मी महाराष्ट्र सरकारविरोधात उच्च न्यायालयात जाणार असून 1 तारखेला कोरेगाव-भीमा येथे जाणार असल्याचेही आझाद यांनी म्हटले. 

कोण आहे चंद्रशेखर आझाद?

तीन वर्षांपूर्वी अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील जातीय हिंसाचाराच्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून दीड महिनाभरापूर्वी सहारनपुर कारागृहातून मुक्तता झाली. मात्र आझाद हे कारागृहात असतानाच आता देशातील दलित बहुजनांचा आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील तरुण या संघटनेकडे आकृष्ट झाला आणि भीम आर्मी मागील दीड वर्षात देशभरात वाढली.  कारागृहातून बाहेर आल्यानंतर भाजपाला सत्तेतून बाहेर करण्याची घोषणा आझाद यांनी केली होती.   

1 जानेवारी 1818 मधील लढा

इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत. भीमा कोरेगाव येथे या लढाईत हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असते. 2018 वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
 

Web Title: Chandrasekhar Azad's release from prison, goes to Koregaon-Bhima ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.