शिक्षण निरीक्षक उत्तर विभागात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन, संगीतकार कौशल इनामदार करणार उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 02:13 PM2018-01-30T14:13:28+5:302018-01-30T14:13:47+5:30

वाचन संस्कृती संवर्धनासाठी टॉक शो, परिसंवाद, चर्चासत्र व विद्यार्थी शिक्षकांचे काव्यसंमेलन

Book festival in Mumbai | शिक्षण निरीक्षक उत्तर विभागात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन, संगीतकार कौशल इनामदार करणार उद्घाटन 

शिक्षण निरीक्षक उत्तर विभागात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन, संगीतकार कौशल इनामदार करणार उद्घाटन 

googlenewsNext

मुंबई - सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांचे वाचन वाढून वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्यावतीने मुंबईत १ व २ फेब्रुवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार करणार आहेत. कुर्ला येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये होणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन संस्कृतीवर टॉक शो, परिसंवाद, चर्चासत्र, विद्यार्थी व शिक्षकांचे काव्यसंमेलन तसेच शाळांना पुस्तक खरेदीसाठी विविध प्रकाशक पुस्तक दालन ठेवणार असल्याची माहिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्यावतीने शाळा व विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले जाते
गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी निघणार असून विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक या ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत. १० वाजता ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होऊन ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार करतील. या उद्घाटनसत्रास प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व दिग्दर्शक युगराज जैन, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी रणजित देशमुख व स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अमर असरानी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ वाजता वाचन संस्कृती संवर्धनासाठी प्रसार माध्यमांची जबाबदारी व भूमिका यावर टॉक शो होणार आहे. याचे सूत्रधार म्हणून स्वामी मुक्तानंद हायस्कुलचे शिक्षक अनिल बोरनारे असतील. 3 वाजता उत्तर विभागातील विद्यार्थ्यांचे काव्यसंमेलन होणार असून या कार्यक्रमाला स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील बालकलाकार दिवेश मेदगे उपस्थित राहणार असून श्री  सरस्वती विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर भारती सूत्रधार असतील. संध्याकाळी ४ वाजता सोशल मीडियाच्या जगात मुलांनी काय वाचावे या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये व्यास क्रिएशनचे संचालक निलेश गायकवाड, मानोसपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा व युवा लेखक विवेक कदम सहभागी होणार असून सूत्रधार म्हणून अमरनाथ हायस्कुलचे शिक्षक सुभाष मोरे असतील. 

शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लेखक आपल्या भेटीला या अंतर्गत लेखक सचिन जगदाळे व जयवंत पाटील सहभागी होणार असून सूत्रधार म्हणून जालिंदर सरोदे असतील. सकाळी  ११.३० वाजता अक्षर सुधारणावर बोरूची शाळा- काळाची गरज या विषयावर प्रा. वृषाली विनायक सहभागी होणार असून सूत्रधार श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनाच्या पूनम राणे असतील. दुपारी २ वाजता उत्तर विभागातील शिक्षकांचे काव्यसंमेलन होणार असून मु.पो. कविता फेम संजय शिंदे सूत्रधार असतील. ग्रंथ महोत्सवाचा समारोप दुपारी ३.३० वाजता होणार असून शालेय शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे तसेच विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ प्रकाश लुल्ला उपस्थित राहणार असून या ग्रंथ महोत्सवाला उत्तर विभागातील शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे यांनी केले आहे

Web Title: Book festival in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.