विद्यार्थी प्रश्नावर छात्र भारती संघटना आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:45 PM2019-06-14T14:45:37+5:302019-06-14T14:47:50+5:30

अंतर्गत गुण न मिळाल्यामुळे जे एसएससी बोर्डाचे जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना प्रमाणशीर अंतर्गत गुण देऊन पास करावे, असा आग्रह धरला

Black flags shown to the education minister by Chhatra Bharti Student Wing | विद्यार्थी प्रश्नावर छात्र भारती संघटना आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

विद्यार्थी प्रश्नावर छात्र भारती संघटना आक्रमक; शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

googlenewsNext

मुंबई - एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. शिक्षणमंत्र्यांविरोधात घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर दणाणून सोडला. १०वी, १२वी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आज रवींद्र नाट्य मंदिर येथे आले होते. त्यावेळी

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुरु आहे, असं शिक्षणंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं. त्यावर आक्षेप घेत छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी, तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही. सर्व अनुदानित तुकड्या आणि कॉलेजेस आधी एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावेत. आधी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन करा मगच इतरांची अ‍ॅडमिशन. विनाअनुदानित तुकडीतील अकरावी प्रवेश गरीब मुलांना महाग पडेल. तसेच अंतर्गत गुण न मिळाल्यामुळे जे एसएससी बोर्डाचे जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना प्रमाणशीर अंतर्गत गुण देऊन पास करावे, असा आग्रह धरला. त्यावर याविषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छात्र भारतीच्या शिष्टमंडाळासोबत बैठकीचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले. 

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे अंतर्गत २० गुण रद्द करत १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास ४ लाख मुलं नापास झाली आहेत. याउलट सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डांनी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत, त्यांचा निकालही चांगला लागला आहे. या सगळ्याचा फटका अकरावी प्रवेशावेळी एसएससी बोर्डांच्या मुलांना बसणार आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये जादा फी देऊन प्रवेश घ्यावा लागेल अशा अनेक अडचणींचा सामना एसएससी बोर्डांच्या मुलांना करावा लागणार आहे असा आरोप छात्र भारतीने केला आहे. तसेच यामुळे एसएससी बोर्डांच्या विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचं सांगितले. 

यावेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले, उपाध्यक्ष विशाल कदम, सुनिल राठोड, विकास पटेकर, सचिन काकड, जितेश किर्दकुडे, अविनाश बनसोडे, आशिष जाधव, निकेत वाळके, समीर कांबळे, निलेश झेंडे, दिपाली आंबे, रेवत थोरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता. 

Web Title: Black flags shown to the education minister by Chhatra Bharti Student Wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.