बेस्ट संपात फूट; संप सुरूच; प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:37 AM2019-01-09T07:37:51+5:302019-01-09T07:38:56+5:30

शिवसेनेने या संपाला नैतिक पाठिंबा दिला होता. परंतु महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत कामगार संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी शिवसेनेला सामील करून घेण्यास नकार दिला.

Best employees strike; Start up; Passengers' arrival in mumbai | बेस्ट संपात फूट; संप सुरूच; प्रवाशांचे हाल

बेस्ट संपात फूट; संप सुरूच; प्रवाशांचे हाल

मुंबई : महापालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संप चिघळला आहे. मात्र या संपामुळे कोंडीत सापडलेल्या शिवसेनेने संध्याकाळी आयुक्त अजय मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला. यामुळे संपात फूट पडली आहे. कामगारांच्या मागण्यांवर उद्यापासून चर्चा होणार असल्याने काही बसगाड्या रस्त्यावर उतरविणार, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे.

शिवसेनेने या संपाला नैतिक पाठिंबा दिला होता. परंतु महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत कामगार संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी शिवसेनेला सामील करून घेण्यास नकार दिला. शिवसेना संपातून माघार घेत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी जाहीर केले. महापालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबरच्या बैठका निष्फळ ठरल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संपाचे हत्यार उपसले. वाहनचालक आणि कंडक्टरसह सर्वच बेस्ट कामगारांनी कडकडीत बंद पाळला. दहा ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक झाल्यानंतर सकाळी बेस्ट उपक्रमातील एकही बस आगाराबाहेर पडली नाही. परिणामी ऐन कार्यालयात जाण्याच्या वेळेतच बसगाड्या नसल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. आपल्या नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाºया प्रवाशांच्या गैरसोयीचा पुरेपूर फायदा उठवत रिक्षा-टॅक्सी आणि खासगी वाहनांनी आपले खिसे भरून घेतले. एकीकडे मुंबईकरांची लूट सुरू असताना महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये संध्याकाळपर्यंत टोलवाटोलवी सुरू होती. याचा नाहक भुर्दंड मात्र २५ लाख चाकरमान्यांना मंगळवारी दिवसभर बसला.

सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांच्या कृती समितीने संपाची हाक दिली होती. मात्र २४ डिसेंबर रोजी नोटीस देऊनही हा संप मोडण्यासाठी बेस्ट प्रशासनाचे फारसे प्रयत्न होताना दिसले नाहीत. महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या दरबारातही बेस्टचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांनी बेमुदत संप पुकारला. शिवसेनेच्या संघटनेने संपात सहभागी न होता नैतिक पाठिंबा दिल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी झाला. सकाळच्या पाळीत एकही वाहनचालक आणि कंडक्टर हजर न राहिल्याने २७ बस आगारांमधील तीन हजार ३०० बसगाड्या रस्त्यावर उतरल्या नाहीत. एसटी महामंडळ, रेल्वेच्या जादा गाड्या सुरू राहिल्याने प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला.
दरम्यान, पालिका प्रशासनाने दुपारी साडेबाराच्या सुमारास कामगार संघटनांची बैठक बोलावली. या बैठकीत पालिका आयुक्त अजय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर उपस्थित होते. कामगारांना लेखी आश्वासन मिळावे या अटीवर कृती समिती ठाम आहे. मात्र आधी संप मागे घ्या, मगच तोडगा काढण्यात येईल. सुधारित वेतन करार यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. यासाठी वेळ हवा असल्याने संप मागे घ्या, यावर पालिका प्रशासनाने जोर दिला. मात्र अडीच वर्षे यावर चर्चा सुरू असल्याने आता माघार नाही, अशी भूमिका बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी घेतली. त्यामुळे ही चर्चा फिस्कटली आणि संप व मुंबईकरांचे हालही सुरूच राहिले.

बेस्टच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर सहा, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रत्येकी दोन अधिक फेऱ्या चालविण्यात आल्या. मध्य रेल्वे मार्गावर दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी ठाणे-सीएसएमटी आणि दुपारी २ वाजून ४९ मिनिटांनी सीएसएमटी-कल्याण अशा दोन अधिक फेºया चालविण्यात आल्या. हार्बर मार्गावरून दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी वाशी-सीएसएमटी आणि दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सीएसएमटी-पनवेल लोकल सेवा चालविण्यात आली.

Web Title: Best employees strike; Start up; Passengers' arrival in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.