कर्जमुक्तीचं श्रेय घेणार असाल तर 3 वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी घ्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 08:18 AM2017-10-20T08:18:59+5:302017-10-20T08:19:01+5:30

benefit of loan waiver scheme | कर्जमुक्तीचं श्रेय घेणार असाल तर 3 वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी घ्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

कर्जमुक्तीचं श्रेय घेणार असाल तर 3 वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी घ्या, उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

Next

मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी (18 ऑक्टोबर) ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.  यावरुन ''कर्जमाफीचा पैसा आम्हीच दिला व कर्जमाफी केली म्हणून मते द्या असले उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नयेत.तसे करणार असाल तर तीन वर्षांत चार हजारांवर शेतकरी मरण पावले, त्यांच्या आत्महत्येची जबाबदारीही या मंडळींनी घ्यावी.'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  आजच्या सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?

कर्जमाफी सन्मान सोहळा अखेर मुंबईत पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले. ऐन दिवाळीत शेतकरी कर्जमुक्त झाला, त्याच्या कुटुंबाची दिवाळी गोड झाली याचा आम्हाला आनंद आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याचा ‘सातबारा’ कोरा करा या एकाच मागणीसाठी शिवसेना पंधरा वर्षे एकाकी लढत आहे याचे विस्मरण सध्याच्या राज्यकर्त्यांना कदाचित झाले असेल, पण कर्जमुक्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या लढय़ाचे स्मरण कायम राहील याबाबत आमच्या मनात शंका नाही. महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांत १७ हजारांवर शेतकऱ्यांनी कर्ज व नापिकीस कंटाळून आत्महत्या केल्या. त्यातील साडेतीन हजार आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळात झाल्या, ही दुःखाची बाब आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देऊ अशी घोषणा करून एकदा सत्तेवर आल्यावर सरकारला या वचनापासून पळ काढता येणार नाही असे आमचे म्हणणे होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली तर महाराष्ट्रात आर्थिक अराजक निर्माण होईल व असे आर्थिक अराजक घडवून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी करावा हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

सत्ता कुर्बान झाली तरी चालेल, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळायलाच हवी, त्यांची कुटुंबे वाचवायला हवीत ही भूमिका घेऊन शिवसेनेने मंत्रिमंडळात व रस्त्यावर राडा केला, शेतकऱ्यांच्या संपालाही पाठिंबा दिला हे सत्य आहे व या कृती आम्ही लपूनछपून केल्या नाहीत तर उघडपणे केल्या आहेत. कर्जमुक्ती झाली नाही तर राजकीय भूकंप घडवू असेही टोक गाठले तेव्हा कुठे शेतकऱ्यांच्या जीवनात आजचा सोनियाचा दिवस उजाडला आहे. शिवसेनेने सत्तेत राहून ही भूमिका घेतली नसती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच गेल्या असत्या व सरकार नवनवीन ‘टोप्या’ घालीत उडय़ा मारीत राहिले असते. आता कर्जमाफीचा राजकीय लाभ कोणी घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. आमच्यासाठी ही ‘श्रेया’ची लढाई अजिबात नव्हती तर शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाची लढाई होती. दोन दिवसांत साडेआठ शेतकऱ्यांचे सातबारा कोरे झाले. राज्याच्या ३६ जिल्हय़ांतील या शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार कोटी रुपये जमा झाल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली. घरातील दिवाळी फराळ वाटावा अशा थाटात हे ‘वाटप’ झाले. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेले शेतकरी हे लाचार किंवा भिकारी नाहीत व त्यांना भीक नको आहे, हे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. हे पैसे कोणी आपल्या खिशातून दिलेले नाहीत किंवा पक्षाच्या गलेलठ्ठ तिजोरीतूनही काढून दिलेले नाहीत. हे राज्य शेतकरी-कष्टकरी श्रमिकांच्या रक्त व घामातून निर्माण झाले व टिकले. त्या कष्टकऱ्यांना अडचणीच्या काळात केलेली ही दिलदार मदत आहे. त्यामुळे कर्जमाफीचा पैसा आम्हीच दिला व कर्जमाफी केली म्हणून मते द्या असले उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नयेत. तसे करणार असाल तर तीन वर्षांत चार हजारांवर शेतकरी मरण पावले, त्यांच्या आत्महत्येची जबाबदारीही या मंडळींनी घ्यावी. कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल. कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम राहो व सरकारची दिलदारी वाढतच जावो, हीच मनोकामना.

Web Title: benefit of loan waiver scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.