जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:07 AM2023-11-18T10:07:33+5:302023-11-18T10:09:27+5:30

आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठविले आहे.

Ask to do public works; Aditya Thackeray's letter to Governor against Govt | जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

जनतेची कामे करायला सांगा; सरकारविरोधात आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

मुंबई : राज्यातले घटनाबाह्य सरकार लोकांच्या सेवेसाठी असलेल्या नगरविकास विभागाच्या मुख्य कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची मूलभूत कर्तव्ये पार पाडण्यास सांगावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.

सध्याच्या सरकारने केलेले घोटाळे, त्यात रस्ते घोटाळा, रस्त्यावरील फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा याबाबत वारंवार पत्राद्वारे तुम्हाला निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. या घोटाळ्यांची लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी केली. प्रशासन त्यानंतर कामाला लागले. आतादेखील नगरविकास विभागाच्या दुर्लक्षामुळे पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी कामे पूर्ण होऊन सुद्धा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

उद्घाटन करण्यासाठी सरकारला एकही व्हीआयपी सापडला नसल्याने हे प्रकल्प जनतेसाठी खुली करून दिलेली नाहीत, याकडे आदित्य यांनी पत्राद्वारे राज्यपालांचे लक्ष वेधले आहे. आघाडी सरकार अस्तित्वात असते तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प सप्टेंबर २०२३ पर्यंत जनतेच्या वापरासाठी खुला झाला असता, असा दावा त्यांनी केला.

मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठविले आहे.

Web Title: Ask to do public works; Aditya Thackeray's letter to Governor against Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.