परीक्षेआधीच उत्तरे व्हायरल; विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याचे प्रयोजन निष्प्रभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 08:47 AM2024-03-30T08:47:37+5:302024-03-30T08:47:59+5:30

या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची राज्यातील शाळांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, आठवीच्या तिन्ही विषयांची उत्तरसूची गुरुवारी रात्री  व्हायरल झाल्या.

Answers go viral even before exams; The purpose of checking the academic performance of the students is ineffective | परीक्षेआधीच उत्तरे व्हायरल; विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याचे प्रयोजन निष्प्रभ

परीक्षेआधीच उत्तरे व्हायरल; विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याचे प्रयोजन निष्प्रभ

मुंबई : राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या संकलित चाचणी-२साठी (प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट-पॅट) तयार करण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या तीन विषयांच्या उत्तरसूची (ॲन्सर की)  परीक्षेआधीच समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. संकलित चाचणीत विद्यार्थ्यांचे विषयाचे ज्ञान, आकलन, कौशल्ये आदी तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेद्वारे तपासले जाते. परंतु, परीक्षेआधीच उत्तरसूची सर्वत्र उपलब्ध झाल्याने इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न निष्प्रभ ठरणार आहे.

४ ते ६ एप्रिलदरम्यान  सरकारी आणि अनुदानित शाळांतील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील संकलित चाचणी-२ होणार आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची राज्यातील शाळांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, आठवीच्या तिन्ही विषयांची उत्तरसूची गुरुवारी रात्री  व्हायरल झाल्या.

ही परीक्षा गोपनीय नाही
तिसरी ते आठवीसाठी संकलित चाचणी २ चार ते सहा एप्रिल या कालावधीत सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये होणार आहे. यासाठी प्रथम भाषा गणित व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचना पत्र राज्यस्तरावरून आम्ही वितरित केल्या आहेत. यातील इयत्ता आठवीची उत्तर सूची फुटल्याचे आमच्या तरी पाहण्यात आले नाही. ही परीक्षा गोपनीय नाही. यावरून मुलांचे पास नापास ठरणार नाही.
- शालेय शिक्षण विभाग

यामुळे गोपनीयता तर संपलीच ?
या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरसूची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून पुरविल्या जातात. शाळांनी परिषदेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा घेणे अपेक्षित आहेत. मात्र, इयत्ता आठवीची उत्तरसूची आधीच व्हायरल झाल्याने त्यातील गोपनीयताच संपली आहे. आठवीबाबत हा प्रकार समोर तरी आला. इतरही इयत्तांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची फुटल्या नसतील, याची खात्री काय, असा प्रश्न एका मुख्याध्यापकांनी विचारला.

संकलित चाचणी म्हणजे काय? 
सत्राच्या शेवटी केलेली विद्यार्थ्यांच्या संपादणुकीची पडताळणी. यात विद्यार्थ्यांचे विषयाचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्ये, अभिरूची, अभिवृत्ती, रसग्रहण आदींचे मूल्यमापन केले जाते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील हा एक भाग.

प्रश्न पडतील का? 
विद्यार्थ्यांना प्रश्नाचे आकलन न झाल्यास शिक्षकांनी त्यांना प्रश्न समजण्यासाठी सहाय्य करावे.  मात्र, उत्तराचा संकेत देऊ नये, अशी स्वरुपाची स्पष्ट सूचना या उत्तरसूचीमध्ये करण्यात आली आहे.
परंतु, उत्तरसूचीच हाती लागल्याने विद्यार्थ्यांवर उत्तर तर सोडाच शिक्षकांना शंका विचारण्याचीही वेळ येणार नाही, अशी तिरकस प्रतिक्रिया एका पालकांनी दिली.

Web Title: Answers go viral even before exams; The purpose of checking the academic performance of the students is ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा