लोढा यांच्या पाठोपाठ केसरकर यांचाही आता मुंबई पालिका मुख्यालयात तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:44 AM2023-10-04T05:44:58+5:302023-10-04T05:45:12+5:30

भाजपवर कुरघोडी करण्याचा शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न?

After Lodha, Kesarkar is now stationed at the Mumbai Municipal Headquarters | लोढा यांच्या पाठोपाठ केसरकर यांचाही आता मुंबई पालिका मुख्यालयात तळ

लोढा यांच्या पाठोपाठ केसरकर यांचाही आता मुंबई पालिका मुख्यालयात तळ

googlenewsNext

मुंबई : उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालिका मुख्यालयात कार्यालय स्थापन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही पालिकेत सक्रिय झाली आहे. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री  दीपक केसरकर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मुख्यालयात तळ ठोकणार आहेत. केसरकर यांची पालिकेत एंट्री होणार असल्याने  शिंदे समर्थक नगरसेवकांचाही पालिकेत राबता सुरू होण्याची शक्यता आहे. केसरकर यांनाही  पालिका मुख्यालयात कार्यालय देण्यात आले आहे. मुंबईकरांच्या समस्या ऐकून  घेण्यासाठी केसरकर मुख्यालयात येतील, असे सांगण्यात आले.

सध्या पालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे. नगरसेवक माजी झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे, असे कारण देत भाजपने लोढा यांच्यासाठी पालिका मुख्यालयात यापूर्वीच  कार्यालय थाटले आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी बरीच चिडचिड केली. मात्र, लोढा तळ ठोकून आहेत. लोढा यांच्या कार्यालयामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांना पालिकेत वावर करणे सोपे झाले आहे.

आता केसरकर यांचीही पालिकेत एन्ट्री होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. विविध विषयांवर ते  पालिका प्रशासनाला सूचना करत आहे. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. केसरकर यांना पालिकेत आणून शिवसेनेनेही पालिका प्रशासनावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

केसरकर यांचे आवाहन  

 मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना, तसेच इतर समस्या असल्यास ४ ऑक्टोबर रोजी त्याबाबतचे  निवेदन अथवा लेखी अर्जासह उपस्थित राहावे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच इतर विषयांसाठी महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.

 बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असल्यास पालकमंत्री गुरुवारी उपलब्ध राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. केसरकर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत पालिका मुख्यालयात उपलब्ध राहणार आहेत.

 मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर नागरी कार्यालयात ते  नागरिकांशी संवाद साधतील, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या  नागरी संपर्कासाठी पालिकेने कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.

Web Title: After Lodha, Kesarkar is now stationed at the Mumbai Municipal Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.