आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:23 AM2019-05-28T06:23:15+5:302019-05-28T06:23:45+5:30

शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Aditya Thakare to contest Vidhan Sabha from Worli | आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढणार!

आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढणार!

Next

मुंबई : शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आदित्य यांनी नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. आदित्य ठाकरे त्यांना आलिंगन देत असल्याचा फोटो त्यांनी पोस्ट केला आणि लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
सूत्रांनी सांगितले की, ठाकरे कुटुंबाशी जवळीक असलेल्या शिवसेनेच्या एका आमदाराने आदित्य यांनी कुठून लढावे यासंदर्भात एक सर्वेक्षण करविले. त्यात चार मतदारसंघांचा पर्याय समोर आला. वांद्रे पूर्व, माहिम, शिवडी आणि वरळी हे ते चार मतदारसंघ आहेत. चारही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे तृप्ती सावंत, सदा सरवणकर, अजय चौधरी आणि सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यापैकी आदित्य यांच्यासाठी वरळी व माहिमचा पर्याय ठेवण्यात आला, असे समजते. त्यातही पहिली पसंती ही वरळीला असेल. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांनी १९९० ते २००४ पर्यंत चार वेळा या ठिकाणी विजय मिळविला होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी विजय मिळवून शिवसेनेला धक्का दिला होता; पण २०१४ मध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी या ठिकाणी मोठा विजय मिळवून बालेकिल्ला राखला.
उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि चाळीतील रहिवासी असे मिश्रण असलेल्या वरळी मतदारसंघाला आदित्य पसंती देऊ शकतात, असे शिवसेनेतील नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या दमदार यशामुळे युतीत उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण असून चार महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची खात्री युतीला वाटत आहे. तसे झाले तर आदित्य यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते मिळू शकेल. मुख्यमंत्रीपद भाजपला आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला असे ठरले तर उपमुख्यमंत्रीपदही त्यांना मिळू शकेल. ठाकरे घराण्यात आजवर कोणीही लोकसभा, विधानसभा व इतर निवडणूक लढलेली नाही. आदित्य हे मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे निर्वाचित अध्यक्ष आहेत.

Web Title: Aditya Thakare to contest Vidhan Sabha from Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.