रस्त्यांवर दिसणार ७२० क्लीनअप मार्शल; महिनाभरात नियुक्ती होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 10:21 AM2024-01-09T10:21:15+5:302024-01-09T10:22:06+5:30

प्रशासकीय दिरंगाईमुळे ७२० क्लीन अप मार्शलच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली होती.

About 720 cleanup marshals on the streets chances of appointment within a month | रस्त्यांवर दिसणार ७२० क्लीनअप मार्शल; महिनाभरात नियुक्ती होण्याची शक्यता

रस्त्यांवर दिसणार ७२० क्लीनअप मार्शल; महिनाभरात नियुक्ती होण्याची शक्यता

मुंबई : प्रशासकीय दिरंगाईमुळे ७२० क्लीन अप मार्शलच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली होती. डिसेंबर महिन्यात त्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, आता या महिन्याच्या अखेरपर्यंत मार्शल नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मुंबईतील रस्त्यांवर हे मार्शल दिसणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी स्वच्छतादूत नियुक्त करण्याचा पालिकेचा विचार होता. स्वच्छता दूत नियुक्त करण्याचा निर्णय बारगळला. त्यानुसार प्रत्येक वॉर्डात ३० ते ३५ याप्रमाणे संपूर्ण मुंबईत ७२० मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. 

आता नियुक्तीचा निर्णय का ?

सध्या  पालिकेला स्वच्छ मुंबई मोहिमेंतर्गत मनुष्यबळाची गरज आहे. पालिकेचे कर्मचारी सफाईची कामे करतात; परंतु कचरा - राडारोडा टाकणे, उघड्यावर कचरा जाळणे आणि अन्य प्रकारची अस्वच्छता करणाऱ्यांना  म्हणावा तसा चाप  लागलेला नाही.  सध्याच्या मनुष्यबळात व्यापक कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे मार्शल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीतही तक्रारींचे पडसाद :

सर्वप्रथम २००७ मध्ये मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. २०१४ साली मार्शल नेमणे बंद करण्यात आले. २०१६ साली पुन्हा एकदा त्यांना रस्त्यावर उतरवले. मात्र, याच सुमारास मार्शलकडून पैसे उकळणे, धमकी देणे, असे प्रकार सुरू झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या. स्थायी समितीच्या बैठकीतही या तक्रारींचे पडसाद उमटले. मार्शल विरोधातील वाढता रोष लक्षात  घेता अखेर कंत्राट संपल्यानंतर मार्शल नियुक्ती बंद करण्यात आली. 

कोरोना काळात त्यांना पुन्हा नियुक्त  करण्यात आले. मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणे एवढेच काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. कोरोना काळ संपल्यानंतर ते पुन्हा लुप्त झाले.

Web Title: About 720 cleanup marshals on the streets chances of appointment within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.