लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:14 AM2024-02-05T10:14:53+5:302024-02-05T10:15:53+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन्ही जिल्हे सज्ज आहेत.

About 45 thousand employees will be required for the lok sabha elections in mumbai | लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन्ही जिल्हे सज्ज आहेत. नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाची मुंबईत आढावा बैठक संपन्न झाली. निवडणुकी संदर्भातील सर्व यंत्रणा सज्ज आहेत. त्यामुळे लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीसाठी उपनगरात साधारण ४५ हजार कर्मचारी मनुष्यबळ लागणार आहे. प्रसंगी ते वाढू शकते, असे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ७ हजार मतदार केंद्रे :

उपनगरात जिल्ह्यात २०११ च्या  जनगणनेप्रमाणे ९३ लाख ५६ हजार ९६२ लोकसंख्या आहे. २०२४ मध्ये ती १ कोटी ६ लाख होण्याची शक्यता आहे. त्यापैकी ७२ लाख १७ हजार ३०८ नोंदणी झालेल्या मतदारांसाठी ७ हजार ३५३ मतदार केंद्र जिल्ह्यात आहेत.  

जास्त मतदान केंद्र?

उपनगरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि चाळी आहेत. त्यापैकी वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, मालाड, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा भागात मतदार केंद्रे अधिक आहेत. उपनगरात ७२ लाख नोंदणी झालेल्या मतदार असल्याने ७ हजार ३५३ मतदार केंद्रे जिल्ह्यात आहेत. यासाठी जवळपास  ४५ हजार कर्मचारी लागणार आहेत. 

मतदार यादी अद्ययावतीकरण :

 नुकतीच अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, त्या कामीही मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत आहेत. मतदार यादी अद्ययावतीकरण, नवीन मतदार नोंदणी,  मतदारांच्या इतर अडचणी आणि प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे.  

 निवडणुकीसाठी शासकीय कर्मचारी, पोलिस, कंत्राटी, खासगी लोक असे मोठ्या संख्येने कर्मचारी मनुष्यबळ लागत असते. उपनगर जिल्हा मोठा असल्याने त्यासाठी जवळपास ४५ हजारांपेक्षा जास्त मनुष्यबळ अपेक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे.

Web Title: About 45 thousand employees will be required for the lok sabha elections in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.