झाडांच्या छाटणीसाठी ३ हजार अर्ज; महापालिकेच्या नोटिसीनंतर नागरिकांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:56 AM2024-04-27T10:56:16+5:302024-04-27T10:59:02+5:30

झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी महापालिकेने नोटिसा पाठवल्यानंतर अस्थापनांनी झाडांची छाटणी करण्यासाठी घाई करण्यास सुरुवात केली आहे.

about 3000 applications for tree trimming citizens rush after municipal notice | झाडांच्या छाटणीसाठी ३ हजार अर्ज; महापालिकेच्या नोटिसीनंतर नागरिकांची धावपळ

झाडांच्या छाटणीसाठी ३ हजार अर्ज; महापालिकेच्या नोटिसीनंतर नागरिकांची धावपळ

मुंबई : झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी महापालिकेने नोटिसा पाठवल्यानंतर अस्थापनांनी झाडांची छाटणी करण्यासाठी घाई करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटिसा पाठवल्या असून ३ हजार आस्थापनांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

पालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली आहे. यंदा मुंबईत १ लाख ११ हजार ६७० झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत २२ हजार ३३४ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पावसाळ्यात झाडे कोसळून, झाडांच्या फांद्या पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी पालिका पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करते. खासगी आस्थापनाच्या आवारातील छाटणीसाठी नोटीस पाठवली जाते. छाटणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे काही ठिकाणी या कामात अडथळा निर्माण होत आहे. पालिकेने आवाहन करीत संबंधित संस्थांना नोटीस जारी केल्या होत्या.

सोसायट्यांमध्ये मोफत करा -

१) वाहने हटविण्यासाठी पालिकेने आवाहन करत वाहने न हटवल्यास आणि वाहनांचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

२) खासगी सोसायट्या आणि आस्थापनांच्या आवारातील वृक्ष छाटणी ९१२ ते ४,४३४ रुपये, मृत झाड काढणे ७४४ ते २,२०९ रुपये, नारळाच्या झावळ्या काढण्यासाठी ८७१ ते ९७५ रुपये शुल्क पालिका आकारते. सोसायट्यांमधील वृक्ष छाटणी मोफत करण्याची मागणी होत आहे.

Web Title: about 3000 applications for tree trimming citizens rush after municipal notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.