कोस्टल रोड ते सी-लिंकला जोडणार महाकाय गर्डर; दोन हजार टनांच्या गर्डरची दोन दिवसांत जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:28 AM2024-04-15T09:28:06+5:302024-04-15T09:31:10+5:30

मुंबईतील कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

a giant girder connecting the coastal road to sea link two thousand ton bow arch girder was added in two days | कोस्टल रोड ते सी-लिंकला जोडणार महाकाय गर्डर; दोन हजार टनांच्या गर्डरची दोन दिवसांत जोडणी

कोस्टल रोड ते सी-लिंकला जोडणार महाकाय गर्डर; दोन हजार टनांच्या गर्डरची दोन दिवसांत जोडणी

मुंबई :मुंबईतील कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी पिलर ७ आणि ९ च्या मध्ये देशातील सर्वांत मोठा आणि ३० बोइंग जेट वजनाइतका दोन हजार टनांचा ‘बो आर्क गर्डर’ २ ते ३ दिवसांत बसवण्यात येणार आहे. 

कोस्टल रोड प्रकल्पातील हा सर्वांत आव्हानात्मक टप्पा असून, अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा ताळमेळ राखत ते काम केले जाणार आहे. संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर पुढील १०० वर्षे टिकेल इतका मजबूत असल्याचे पालिकेने सांगितले.

प्रियदर्शनी पार्क ते वरळीदरम्यान कोस्टल रोड मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी दोन हजार टन वजनाचा गर्डर बसविण्यात येणार आहे. १३६ मीटर लांब असलेल्या या गर्डरमुळे  कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक अंतर जोडले जाणार असून दक्षिणेकडील बाजूच्या चार लेन सज्ज होतील.

या गर्डरचे फॅब्रिकेशन अंबाला येथे झाल्यानंतर तो रस्ता मार्गे न्हावा गावात आणण्यात आला. तेथे त्याचे पुढील काम करण्यात आले असून, आता तो तयार झाला आहे. माझगाव जेट्टीवरून मोठ्या बार्जच्या मदतीने आता हा गर्डर वरळी येथे आणण्यात येत आहे. तेथे असलेल्या खांबावर तो अलगदपणे ठेवण्याचे काम केले जाणार आहे.

वांद्रे सी लिंकची कनेक्टिव्हिटी -

कोस्टल रोड आणि सी लिंकदरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद आहे. त्यामुळे वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

वाहने सी-लिंक ते कोस्टल रोड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतील. ‘बॉ आर्क गर्डर’ ठेवल्यानंतर त्यावर काँक्रिटीकरणाची आणि इतर प्रक्रिया, चाचण्या होतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सर्व कामे पूर्ण करून हा मार्ग सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता एम. स्वामी यांनी दिली. 

Web Title: a giant girder connecting the coastal road to sea link two thousand ton bow arch girder was added in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.