काही बंडोबा झाले थंडोबा, पण डोकेदुखी कायमच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 10:09 AM2024-04-09T10:09:09+5:302024-04-09T10:09:42+5:30

नाराजी दूर करण्यासाठी शिंदे, फडणवीस, पवारांची कसरत

A few drops of cold, but the headache is still there | काही बंडोबा झाले थंडोबा, पण डोकेदुखी कायमच

काही बंडोबा झाले थंडोबा, पण डोकेदुखी कायमच

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महायुतीमधील तीन पक्षांमध्ये जिल्ह्याजिल्ह्यात असलेली बंडखोरी कमी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना यश आले असले तरी माढ्यामधील मोहिते परिवाराचा राग शांत करण्यात फडणवीस यांना यश आलेले नाही. अन्य काही ठिकाणची नाराजी देखील कायम आहे.

फडणवीस यांनी अनेक बैठका घेतल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, निवडणूक समितीचे अध्यक्ष आ. श्रीकांत भारतीय यांनीही संकटमोचकांची भूमिका बजावली. 

शिंदे यांचे बंड झाले थंड
बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला, पण शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना कॉल केला. तसेच बावनकुळे यांनी त्यांना नागपूरला भेटायला बोलावले. त्यानंतर शिंदे यांचे बंड थंड झाले.

गव्हाणकरांचा रुसवा गेला
बाळापूरचे माजी आमदार आणि अकोला जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते नारायण गव्हाणकर यांनीही भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या विरुद्ध बंड केले, उमेदवारी अर्जही भरला. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कॉल केला आणि गव्हाणकर यांनी माघार घेतली. 

अमरावतीत समेट की? 
अमरावतीचे सर्व भाजप नेते नवनीत राणांच्या विरोधात होते. फडणवीस, बावनकुळे यांनी समेट घडवून आणला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष असेल.

खडसेंमुळे महाजन नाराज
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ते भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी लपून राहिलेली नाही. खडसे यांना इतके महत्त्व कशासाठी ते विझलेला दिवा आहेत, असा खोचक टोला त्यांनी खडसे यांना लगावला. महाजन यांची विधाने लक्षात घेता उद्या खडसे भाजपमध्ये परतले तरी दोघांचे संबंध चांगले राहतील याबाबत खात्री देता येत नाही अशी स्थिती आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दोघांचे मनोमिलन घडवून आणतात का याबाबत उत्सुकता आहे.

गवळींचा बहिष्कार कायम
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात उमेदवारी नाकारलेल्या भावना गवळी यांचा राग अजूनही कायम आहे. त्यांच्या जागी उमेदवारी मिळालेल्या राजश्री पाटील या मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरत असताना गवळी त्या ठिकाणी गैरहजर होत्या. गेले चार दिवस त्या प्रचारात उतरलेल्या नाहीत.  

मोहितेंचे आव्हान सर्वात मोठे
सोलापूर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ असलेल्या मोहिते पाटील घराण्याची नाराजी कशी दूर करायची या प्रश्नाचे उत्तर अद्याप भाजपला मिळालेले नाही. फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले पण यश आलेले नाही. माढा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मोहिते यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.

हिंगोली, परभणीत बंड
हिंगोलीत बाबूराव कदम शिंदेसेनेचे उमेदवार आहेत, पण तिथे भाजपचे नेते शिवाजीराव जाधव यांनी उमेदवारी कायम ठेवली. भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर आणि श्याम भारती महाराज या दोघांनी माघार घेतली. परभणीमध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल मुदगलकर रिंगणात कायम आहेत. 

राम शिंदेंची तलवार म्यान
माजी मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगर मतदारसंघात डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समजूत काढल्यावर शिंदे यांनी तलवार म्यान केली.

बारामतीत पुढे काय? 
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील तसेच शिंदे सेनेचे नेते विजय शिवतारे या दोघांनीही सुनेत्रा पवार यांना सहकार्य करण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी काय होते, याची उत्सुकता आहे.

Web Title: A few drops of cold, but the headache is still there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.