मुंबईत भरतीत कोसळधार झाल्यास मोठे आव्हान, यंदा साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:27 PM2022-06-17T13:27:58+5:302022-06-17T13:28:15+5:30

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत काही दिवस समुद्रात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

A big challenge if there is a high tide surge in Mumbai this year waves more than four and a half meters high | मुंबईत भरतीत कोसळधार झाल्यास मोठे आव्हान, यंदा साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळणार!

मुंबईत भरतीत कोसळधार झाल्यास मोठे आव्हान, यंदा साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळणार!

googlenewsNext

मुंबई :

सध्या पाऊस मुंबईवर रुसला आहे. मुंबईकर उकाडा आणि घामाने प्रचंड हैराण झाले असून, पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहत आहेत. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत काही दिवस समुद्रात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे जर मुसळधार किंवा कोसळधार पाऊस पडल्यास मुंबई महापालिकेपुढे भरतीचे प्रचंड मोठे आव्हान असणार आहे. या भरतीप्रसंगी मुंबईकरांनी सतर्क राहावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.  यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच भरतीचे दिवस असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. शिवाय उंची ही समुद्रातील लाटांची उंची नसून, ती भरतीच्या पाण्याची आहे, असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदमाता, मीलन सबवेसह गांधी मार्केट, मस्जिद बंदर अशा विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यानंतर गुडघाभर पाणी साचते. त्यात भरती असल्यास तर परळसारख्या भागात गुडघ्याच्या वर पाणी जाते. काही सोसायट्यांमध्येही पाणी शिरते. नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरते. घाटकोपर, वांद्रे, दहीसर, मालाड येथे काही ठिकाणी अनेक भागांत नालेसफाई न झाल्यास कचरा, प्लास्टिकमुळे तसेच गाळामुळे नाले तुंबतात आणि अनेक भाग, रस्ते, घरे पाण्याखाली जातात. २००५ ला देखील भरती आणि मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण मुंबई अक्षरश: बुडाली होती. अनेकांचे जीव गेेले होेते. पावसामुळे मुंबईची लाइफलाइन ठप्प होऊन जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विविध विभागांना सतर्कता बाळगावी लागेल.

>> सीसीटीव्ही   ५,३६१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच
>> जीवरक्षक तराफे २० जीवरक्षक तराफे करणार संरक्षण
>> राष्ट्रीय आपत्ती पथक - राष्ट्रीय आपत्ती पथकाच्या तीन तुकड्या सज्ज

हे पंपिंग स्टेशन्स काम करणार
मुंबईत मुसळधार पाऊस झालाच तर हाजी अली क्लीव्हलॅण्ड, इर्ला ब्रिटानीया, गझदरबंद येथे बसविण्यात आलेले पंपिंग स्टेशन कार्यरत करण्यात येतील. या पंपिंग स्टेशन्सद्वारे साचलेले पाणी समुद्रात फेकण्यात येईल.

या भागांवर नजर
मुंबई तुंबलीच तर पाण्याचा जलद निचरा व्हावा, तसेच जीवितहानी होऊ नये यासाठी प्रामुख्याने हिंदमाता, गांधी मार्केट, नॅशनल कॉलेज, मिलन सबवे, अंधेरी सबवे या ठिकाणांवर महापालिकेची २४ तास नजर असणार आहे. अग्निशमन दलाला सुरक्षा बोटी तसेच जीवरक्षक सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

५० मिमीपेक्षा अधिक पाऊस धोकादायक
१६, १७ आणि १८ जून हे तीन दिवस अरबी समुद्रात तब्बल ४.८० ते ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. या भरतीदरम्यान ५० मिमीहून अधिक पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबु शकते.

 

Web Title: A big challenge if there is a high tide surge in Mumbai this year waves more than four and a half meters high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.