मराठी भाषा विभागाचे 4 सर्वोच्च पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:13 PM2019-01-03T14:13:55+5:302019-01-03T14:14:36+5:30

वर्ष २०१८चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांना आणि श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे.

4 top honors Announced in Marathi language department | मराठी भाषा विभागाचे 4 सर्वोच्च पुरस्कार जाहीर

मराठी भाषा विभागाचे 4 सर्वोच्च पुरस्कार जाहीर

googlenewsNext

मुंबई  -  वर्ष २०१८चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांना आणि श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या वर्षीचा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. कल्याण काळे यांना आणि मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.

मराठी नाट्यलेखनात एक मापदंड निर्माण करणाऱ्या महेश एलकुंचवार यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा विंदा करंदीकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैविध्य, गांभीर्य, व्यामिश्रता, आशयघनता आणि नाट्यमयतेसह पात्रांच्या मनाचा शोध घेण्याची विलक्षण क्षमता या घटकांसह एलकुंचवार यांनी नाट्यलेखन केले. त्यांनी रसिकांचे प्रबोधन केले आणि त्याचबरोबर दिग्दर्शक अभिनेते यांचा कस लागेल असे नाट्यलेखन केले. त्रिधारा (तीन नाटकांची मालिका) नाट्यप्रकार मराठी भाषेला देणाऱ्या महेश एलकुंचवार यांच्या अनेक नाटकांचे हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांना आतापर्यंत सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.




गेली ४८ वर्षे मराठी प्रकाशन क्षेत्रात निरंतरपणे कार्यरत असलेल्या आणि आजपर्यंत सुमारे ३०० दर्जेदार पुस्तके प्रकाशित केलेल्या साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास यंदाचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार देण्यात येणार आहे. सुरेश भट, राम शेवाळकर, मारुती चितमपल्ली इत्यादी नामवंत साहित्यिकांसह; बालसाहित्य ते आध्यात्मिक साहित्य आणि कोश ते प्रवास वर्णने...अशी वैविध्यपूर्ण ग्रंथनिर्मिती साहित्य प्रसार केंद्राने केली आहे. वाचनसंस्कृती संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रमही साहित्य प्रसार केंद्र सातत्याने योजत असते.




मराठी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक, भाषावैज्ञानिक आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडपणे कार्यरत असलेले डॉ. कल्याण काळे यांना या वर्षीचा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सुमारे ३१ वर्षांच्या महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनातून डॉ. काळे यांनी मराठी अभिमानी आणि अभ्यासक असे असंख्य विद्यार्थी घडवले. त्यांनी भाषाविज्ञानविषयक सखोल चिंतनातून मराठी भाषा विकासाच्या चळवळीला योग्य दिशा दिली. भाषा आणि जीवन या त्रैमासिकाचे संपादन आणि मराठी अभ्यास परिषदेचे कार्य या माध्यमातून डॉ. अशोक केळकरांची धुरा डॉ. कल्याण काळे यांनी समर्थपणे वाहिली.

झाडीबोलीचे अभ्यासक, प्रसारक आणि झाडीबोली साहित्य चळवळीचे अध्वर्यू डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना यंदाचा मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार देण्यात येणार आहे. झाडीबोली साहित्य संमेलने, झाडी-मराठी कोशलेखन, लेखकांना प्रोत्साहन व प्रशिक्षण आणि झाडीबोली संशोधन व मार्गदर्शन केंद्राचे कार्य या माध्यमातून डॉ. बोरकर झाडीबोलीचा विकास साधत आहेत. मराठीची महत्त्वाची बोली असलेल्या झाडीचे जतन व संवर्धन साधत, डॉ. हरिश्चंद्र बोरकर मराठी भाषा विकासात अमूल्य योगदान देत आहेत.

श्री. पु. व विंदा पुरस्कार निवड समितीमधील सदस्य श्री. श्रीपाद भालचंद्र जोशी, श्री. बाबा भांड आणि पाडगांवकर व केळकर पुरस्कार समितीतील सदस्य डॉ. सदानंद मोरे, श्री. दिलीप करंबेळकर व श्री. बाबा भांड यांनी , प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करुन, मा. मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेतले.

मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी २०१९ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने, मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहितीही श्री. विनोद तावडे, मंत्री, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी दिली.

Web Title: 4 top honors Announced in Marathi language department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी