लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ज्येष्ठ बँकर विक्रम लिमये येत्या सोमवारी राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने लिमये यांची भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या प्रशासकीय समितीवर नेमणूक केली होती. शुक्रवारी ते या जबाबदारीतून मुक्त झाले. गेल्या महिन्यात सेबीने त्यांची एनएसईच्या प्रमुखपदी निवड केली होती. बीसीसीआयची जबाबदारी सोडली, तरच त्यांना एनएसईवर नेमणूक मिळणार होती. एनएसईच्या बोर्डाने लिमये यांची व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदी फेब्रुवारीतच निवड केली होती. चित्रा रामकृष्णन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. मार्चमध्ये एक्स्चेंजच्या भागधारकांनी लिमयेंच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले होते.
दांडगा अनुभव
मुंबईतील आर्थर अँडरसनपासून १९८७ मध्ये त्यांनी करिअर सुरू केले. एर्न्स्ट अँड यंग सिटी बँकेत, तसेच आठ वर्षे क्रेडिट सुसी फर्स्ट बोस्टनमध्ये वॉलस्ट्रीटवर आठ वर्षे काम केले. त्यानंतर, २00४ मध्ये ते मुंबईला परतले. अनेक सरकारी समित्या व औद्योगिक संघटनांवरही काम केले आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या लिमये यांनी फायनान्स अँड मल्टिनॅशनल मॅनेजमेंट या विषयात पेनसिल्व्हानियातील व्हॉर्टन स्कूल युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे.