खोपोली फास्टची ती 30 मिनिटे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 05:31 AM2018-06-12T05:31:57+5:302018-06-12T05:32:14+5:30

आज काम लवक़र उरकून घरी जाण्यासाठी करीरोड ऐवज़ी भायखळा वरून जलद लोकलने जाण्याचे ठरवल. कार्यालयातून ख़ाली उतरताच टॉक़्सीही पुढ़यातच आल्याने लवकर घरी पोहचण्यावर स्वतः शिक्कामोर्तब करत उत्साहाने निघाली. पण....

30 minutes in Khopoli fast Local | खोपोली फास्टची ती 30 मिनिटे...

खोपोली फास्टची ती 30 मिनिटे...

- मनीषा म्हात्रे

आज काम लवक़र उरकून घरी जाण्यासाठी करीरोड ऐवज़ी भायखळा वरून जलद लोकलने जाण्याचे ठरवल. कार्यालयातून ख़ाली उतरताच टॉक़्सीही पुढ़यातच आल्याने लवकर घरी पोहचण्यावर स्वतः शिक्कामोर्तब करत उत्साहाने निघाले. वेळेत स्थानक गाठलं. समोरच १०.२ च्या कल्याण फ़ास्टचा इंडिकेटर पाहून आनंदात भर पडली. त्याच वेगात फलाट क्रमांक ३ गाठले. टाइमपास म्हणून भेळ घेत इतरांप्रमाणे लोकलच्या दिशेने नज़र लावून उभी राहिले. पाहता पाहता धीम्या गतीच्या लोकल जणू चिडवून पुढ़े जाताना दिसल्या. घड़्याळाचा काटा जसजसा पुढ़े सरकत होता तसतसा उत्साहही कमी होत होता. कानात गाणी ऐकण्यासाठी घातलेला हेडफोनही बंद आहेत याचेही भान नव्हत. दुसरीकड़े फलाटाच्या पाय-या एखाद्या गड़ाप्रमाणे भासत होत्या. म्हणून पटकन धीम्या लोकलने जाण्याच्या विचारालाही ब्रेक लागत होता. 
       रागात भर म्हणून की काय... १०.२ ची कल्याण जलदही रद्द करण्यात आली. आणि इंडिकेटरही ग़ायब झाला. स्वतःचीच चीडचीड करत तिथेच थांबले. क़ाही वेळाने १०.५ ची खोपोली फ़ास्ट लागल्याने विचारांनीही ज़ोर धरत स्वतःलाच धीर दिला. त्यातही २० मिनीटाच्या प्रतीक्षेनंतर खोपोली फ़ास्ट धड़कली. आणि सुटकेचा निश्वास सोडला.
      जवळपास आम्ही ४० ते ४५ जणी डब्ब्यात. प्रत्येकजणी आपआपल्या जगात रमल्या होत्या. कोणी मोबाईल मध्ये दंग तर क़ाही जणी जागा अड़विण्यात. आम्ही मात्र भेळीचा आनंद घेत प्ले स्टोरमध्ये सर्च मोहीमेत व्यस्त झालो. क़ाही कळण्याच्या आतच १०.२० ला अचानक जोराचा स्फोट झाला. विद्युत पुरवठा खंडित झाला. आणि महिलांचीं मुलांना, सामानासहित पळापळ सुरु झाली. नेमके काय झाले हे समजण्याच्या आधीच त्यांनी स्वतःच मरण समोर आल्या सारख पळापळ सुरु केली. त्या एकमेकींवर पडू लागल्या. जीव वाचविण्यासाठी लोकलमधुन ख़ाली उड़ी मारण्यासाठी धड़पडू लागल्या. अशात माझ्यातला पत्रकार पहिला जागा झाला.  आणि मी पहिली लोकमत ब्रेकिंगवर धड़कले. तेथे घटनेची माहिती दिली. नेमके काय झाले? याबाज़ूने माहिती घ्यायला दरवाज़ाबाहेर डोकावणार तोच गर्दिला बाज़ूला सावरुन महिलांच्या रक्षणासाठी असलेले पोलीस काका आत बसा... आत बसा.. असे ओरडत जवळ आले. ए पोरी आत बस की आत... म्हणत त्यांनी हात धरुन आत बसवले. बाहेर काळकुट अंधार. लोकल अथवा मेल ख़ाली चिरडण्याच्या भीतीने ख़ाली उड़ी घेण्याची हिंमत झाली नाही.  अशात संपादकांचा फ़ोन खणखणला. माहिती आणि परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी विचारपूस केली. त्यांच्याशी बोलून धीर आला. 
 अशातच लागोपाट आणख़ीन दोन स्फोट झाले. आणि माझेही हृदयाचे ठोके कधी वाढ़ले हेही कळले नाही. क्षणासाठी नजरे समोर बोम्ब ब्लास्टच्या बातम्या उभ्या राहील्या. आईच आठवली. वेलेत घरी ये हा... काळजी घे चे शब्द आठवू लागले. 
आपल्या जवळच्या व्यक्तींना माहिती देताना महिलांनी हंबरडाच फोडला. कुणी आई, कुणी वडील तर क़ाहीनी पतीला फ़ोन करून स्वतःला धीर देत होत्या. देवाचा धावा सुरु होता. 
  लोकमत ब्रेकिंगवर अपडेट देत असताना समोरच गरोदर महिला पोलीस ख़ाली उतरण्यासाठी भांडताना दिसली. तिला पाहून माझी भिती मात्र गेली. तिला सुखरूप कशी उतरवू हाच विचार  सुरु झाला. अखेर गाड़ीत बसून जीव धोक्यात असल्याचे माहिती असताना तिच्या उतरायचे नाही असे ठरवले. त्यांना शांत करत पुढ़े बसवले. मात्र आग लागली... शॉक बसला तर बाळाला काय होईल असे तिचे शब्द सतत कानावर पड़त होते. मात्र लवकरच गाड़ी सुरु होईल काळजी करू नका... या शब्दांच्या पलीकड़े मी काहीच करू शकत नव्हती. ख़ाली उतरविण्यासाठी तिचा आटापिटा सुरु होता. मात्र या अवस्थेत ख़ाली उतरविणे ही धोकादायक होते. आणि त्यांच्यासाठी हेल्पलाईनला कॉल करणार तोच रेल्वे पोलीस तेथे आले. त्यांच्या क़डुनही महिला पोलीस सोनल क़दम यांना समजविण्यात आले. त्याना घेउन आम्ही निवांत बसलो. 
 दुसरीकड़े हातात काठी घेत महिलांना शांत करणारे होमगार्ड पोलीस मच्छिंद्रनाथ कुताळ यांची धड़पड ख़रच शब्दात व्यक्त करणारी नव्हती. पोलीस घटनास्थळी दाखल होन्यापूर्वी  तेच सर्वाचे आधार होते. सुरुवातीला महिलाना डब्ब्यातून ख़ाली उतरवू नये यासाठी चोख अशी जबाबदारी बजावली.
      हळूहळू बघ्यांची गर्दी वाढली. पुढ़च्या डब्ब्यातले प्रवासी ख़ाली उतरुन आम्हालाही उतरण्याचा सल्ला देत होते. मात्र त्या पोलीस महिलेला उतरणे शक़्य नसल्याने मी उतरले नाही. मझ्यासह आणख़ीन क़ाही महिला थांबल्या. रेल्वे पोलिसांकडुन दुरुस्तीचे काम सुरु झाले. ओवरहेड वायर वर फांदी पड़ल्याने हा स्फोट झाल्याचे समोर आले. आणि ३० मिनिटाने काम पूर्ण झाले. लोक़लमध्ये सुरु झालेल्या दिव्याच्या प्रकाशात सर्वाचे चेहरे खुलले. मात्र तेव्हा डब्ब्यात त्या महिला पोलीस सपना बागुल यांच्यासह आम्ही अवघ्या १० ते १२ जणीच शिल्लक होतो. 
 प्रत्येकजणी एकमेकांकडे पाहत हसत होत्या. खोपोली फास्टची ही  ३० मिनिटे आयुष्यभरासाठी एक वेगळीच आठवण ठेवून गेले.

Web Title: 30 minutes in Khopoli fast Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.