भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

By जयंत होवाळ | Published: May 17, 2024 07:58 AM2024-05-17T07:58:58+5:302024-05-17T08:00:59+5:30

तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे  आव्हान यावेळी भाजपपुढे आहे.

bjp hat trick or not this lok sabha election 2024 bitter challenge to retain the constituency for the third time | भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

भाजपची हॅट्ट्रिक की यंदा चकवा? तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे आव्हान

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उत्तर-पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय पाटील आणि महायुतीचे मिहीर कोटेचा अशी थेट लढत होत आहे. २०१४ आणि २०१९ सालापासून हा मतदारसंघ  भाजपने ताब्यात ठेवला आहे. तिसऱ्यांदा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे कडवे  आव्हान यावेळी भाजपपुढे आहे.

मराठी-गुजराती वाद, धारावीतील प्रकल्पग्रस्तांचे मुलुंडमध्ये होणारे पुनर्वसन, कांजूर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असे मुद्दे प्रचारात असले तरी मराठी-गुजराती वादाची किनार निश्चित आहे. या मतदारसंघातील मराठी भाषकांची संख्या, विक्रोळी, मानखुर्द-शिवाजी नगर भागातील मुस्लिम मतदारांची संख्या, उद्धव सेनेला मोठ्या प्रमाणावर मानणारे मतदार, शिंदेसेना व अजित पवार गटाचे नगण्य अस्तित्व, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसची  ताकद असे भक्कम पाठबळ महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे. मुंबईतील केवळ याच मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला हे विशेष. या मतदारसंघात मागील वर्षापासून गुजराती-मराठी असा वाद सुरू आहे. 

घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतून झळकलेले नामफलक, मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारणे या घटनांमुळे हा वाद धुमसत आहे.  दोन्ही उमेदवार असा वाद नसल्याचे सांगत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. मिहीर कोटेचा पदयात्रा सुरू असताना वडापाव खा, मिसळ खा, या माध्यमातून वाद शमविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

अंतर्गत धुसफुस

विद्यमान खासदार मनोज कोटक यांचे तिकीट कापल्यामुळे कोटक नाराज आहेत. त्यामुळे त्यांची व कार्यकर्त्यांची नाराजी कोटेचा यांना दूर करावी लागत आहे. मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, असा शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र, उद्धव सेनेकडे मतदारसंघ गेल्याने शरद पवार गटात नाराजी होती. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेतल्याने मतांचा खड्डा भरून काढण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. मानखुर्द - शिवाजीनगर येथील सुमारे तीन लाख मते महत्त्वाची ठरणार आहेत. मुलुंड आणि घाटकोपरचा काही भाग गुजरातीबहुल तर विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर आणि मुलुंडच्या काही भागात मराठी प्राबल्य आहे.

२०१९ मध्ये काय घडले ?
उमेदवार    पक्ष     प्राप्त मते
मनोज कोटक     भाजप     ५,१४,५९९ संजय पाटील    राष्ट्रवादी    २,८८,११३
नोटा      -     १२,४६६ 

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के
२०१४    किरीट सोमय्या     भाजप    ५,२५,२८५    ६०.९५ 
२००९     संजय पाटील    राष्ट्रवादी    २,१३,५०५     ३१.९७
२००४    गुरुदास कामत    काँग्रेस    ४,९३,४२०    ५३.३०
१९९९    किरीट सोमय्या    भाजप    ४,००,४३६    ४३.०८ 


 

Web Title: bjp hat trick or not this lok sabha election 2024 bitter challenge to retain the constituency for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.