डोळा लवणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, मात्र त्याचा संबंध शुभ-अशुभ शकुनाशी जोडला गेला आहे, पण ते खरंच आहे का?
कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो.
त्याचा संबंध शकुनाशी कसा जोडला गेला माहीत नाही, पण त्यामुळे कधी मानसिक दिलासा मिळतो तर कधी टेन्शनही येतं.
ऐकीव माहितीनुसार डावा डोळा लवत असेल तर शुभ शकुन मानला जातो आणि उजवा डोळा लवत असेल तर अशुभ संकेत मानला जातो.
आपल्या शरीराचा उजवा भाग तुलनेत जास्त सक्रिय असतो, त्यात कोणताही बिघाड होणे म्हणजे कामात अडथळा निर्माण होणे.
त्यामुळे उजवा डोळा लवणे हे अशुभ मानले जात असावे आणि डाव्या डोळ्याचे सांगायचे तर...
तर डावी बाजू सहजतेने होणाऱ्या कामांसाठी ओळखली जाते, त्यामुळे डाव्या डोळ्याचे लवणे म्हणजे गोष्टी सहजतेने घडणे असा संदर्भ लावला जातो.
काही का असेना, यात अंधश्रद्धेचा भाग नसून मानसशास्त्राचा भाग जोडला आहे असे म्हणता येईल.
काहीतरी छान घडणार, ही आशा माणसाला जगायला बळ देते. वाईट गोष्टी घडतच असतात, परंतु चांगल्या गोष्टी घडण्याची आपण वाट पाहतो.
त्यामुळे ऐकीव माहितीपैकी चांगले ते घ्यावे, वाईट ते सोडून द्यावे; तरंच आपण अंधश्रद्धेतून समजूतदार पणाकडे वाटचाल करू; बरोबर ना?