प्रार्थनेचे शुभफल हवे? स्वामी म्हणाले...

प्रार्थनेचे शुभफल लगेच मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

प्रत्येकाची प्रार्थना का फलद्रुप होत नाही, याचे कारण स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात.

एकदा शिष्यांसमवेत स्वामी महाराज प्रवासाला निघाले. अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. स्वामी सोबत असूनही सगळे घाबरले.

सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. ते पाऊस थांबायची वाट पाहत होते. पण पावसाचा जोर वाढतच चालला होता.

भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले की, अरे अशी गयावया करण्यापेक्षा पावसाला हात जोडून विनवणी करा.

सर्वांनी मनापासून प्रार्थना केली, तर तो तुमचे नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते.

यासाठी सर्वांनी एकमुखाने एकदिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली.

एकाएकी पाऊस कमी होत पूर्ण थांबला! तात्पर्य स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली, तर तिचे फळ निश्चित मिळते.

प्रार्थना अशी करा, की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी. तर ती खरी प्रार्थना!

मागणे असे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर समष्टीचा अर्थात सर्व जीव सृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल.

दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे कायम लक्षात ठेवा. 

स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार  करायला हवा!

देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो.

Click Here