लालपरीचे लोकेशन प्रवाशांना कळावे, यासाठी तयार केलेल्या एसटीच्या अॅपची सुरुवात १५ ऑगस्टला होणार आहे.
एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅण्डवर येण्याची गाडीची अचूक वेळ समजणार आहे.
एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रीप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे.
त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ आणि थांबेदेखील समजणार आहेत. यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
राज्य सरकारने कोविड-१९पूर्वी एसटी बसमध्ये जीपीएस बसवण्याचे आणि प्रवाशांना बस ट्रॅक करता याव्यात, यासाठी अॅप तयार करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते.
ऑगस्ट २०१९मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अॅप्लिकेशन लाँच केले, जे कंपनीला सहा महिन्यात उपलब्ध करून द्यायचे होते. परंतु, अद्याप ते काम पूर्ण झाले नाही.
सध्या १२ हजार बसेसमध्ये जीपीएस बसवण्यात आले असून, उर्वरित बसमध्ये तातडीने ही यंत्रणा बसवण्याचे निर्देश आता देण्यात आले आहेत.
लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, याची माहिती मिळत नसल्याने तासनतास ताटकळत राहावे लागत होते.