जो पक्षी आपल्या राज्याच्या जैवविविधतेचे प्रतिनिधित्त्व करतो त्याला राज्यपक्षी म्हणतात. महाराष्ट्रासकट अन्य राज्यांचे राज्यपक्षी जाणून घेऊ.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल आहे. तो शांती व सौंदर्याचे प्रतीक मानला जातो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तसेच पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलात तो आढळतो.
आंध्र प्रदेशचा राज्यपक्षी निळकंठ आहे. निळसर-हिरवट पंखाचा हा पक्षी भगवान शिवाचे प्रतीक मानला जातो आणि दसऱ्याला त्याचे दिसणे शुभ मानले जाते.
छत्तीसगडचा राज्यपक्षी डोंगर मैना आहे. ती माणसांसारखी हुबेहूब सूर काढते. बस्तर परिसरात ती जास्त आढळते म्हणून तिला बस्तर मैनाही म्हणतात.
मध्य प्रदेशचा राज्यपक्षी स्वर्गीय नर्तक आहे. तो उडताना एवढा नाजूक दिसतो की स्वर्गातून आल्यासारखा वाटतो.
केरळचा राज्यपक्षी मोठा धनेश. आकाराने मोठा, रंगाने काळा, पिवळा आणि पांढरा, मोठ्या चोचीचा धनेश पश्चिम घाटात, केरळच्या जंगलात आढळतो.
हिमाचल प्रदेशचा राज्यपक्षी आहे पश्चिमी त्रागोपान. हा पक्षी रंगाने खूपच निळसर, लालसर आणि काळसर ठिपक्यांनी भरलेला असतो. त्याचे दर्शन दुर्मिळच!
काळा फ्रॅन्कोलिन हा हरयाणाचा राज्यपक्षी. कापूस, गहू आणि मका शेतीच्या भागांमध्ये सहज आढळणारा पक्षी आहे. मोठ्या आवाजाने तो लक्ष वेधून घेतो.
गुजरातचा राज्यपक्षी आहे मोठा फ्लेमिंगो. लालसर गुलाबी रंगाचा हा पक्षी लांबट मान आणि मोठ्या पायांमुळे आकर्षक दिसतो.
गोव्याचा राज्यपक्षी आहे लाल गळ्याची बुलबुल. तिच्या गोड गळ्याने ती सर्वांना आकर्षून घेते.
बिहारचा राज्यपक्षी मोर आहे आणि तोच आपला राष्ट्रीय पक्षीसुद्धा आहे. पावसाळ्यात पंखांचा पिसारा फुलवून नाचणारा मोर कायमच सुंदर दिसतो.
आसामचा राज्यपक्षी वुड बदक आहे. हा पक्षी तिथे दुर्मिळ होत असल्याने त्याला राज्यपक्षी घोषित करून संरक्षण देण्यात आले आहे.