किचनमधील सुरक्षिततेसाठी सिलेंडरची एक्स्पायरी डेट तपासणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे.
गॅस सिलेंडरच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन लोखंडी पट्ट्यांपैकी एका पट्टीवर काही अक्षरे आणि अंक लिहिलेले असतात (उदा. D-26). हीच सिलेंडरची एक्स्पायरी डेट असते.
सिलेंडरवर महिने ओळखण्यासाठी इंग्रजीतील A,B,C,D ही ४ अक्षरे वापरली जातात.
A म्हणजे जानेवारी ते मार्च, B एप्रिल ते जून, C जुलै ते सप्टेंबर, D ऑक्टोबर ते डिसेंबर असा त्याचा अर्थ होतो.
अक्षरासोबत लिहिलेले दोन अंक हे वर्ष दर्शवतात. जर सिलेंडरवर 'B-26' लिहिले असेल, तर त्याचा अर्थ असा की, त्या सिलेंडरची मुदत २०२६ मधील जून महिन्यात संपणार आहे.
ही तारीख सिलेंडरमधील गॅस संपण्याची नसते, तर सिलेंडरच्या 'हायड्रोलिक टेस्टिंग' ची असते. या तारखेनंतर सिलेंडरची मजबुती कमी होऊ शकते आणि तो वापरणे धोक्याचे ठरू शकते.
सिलेंडर घेताना नेहमी हा कोड तपासा. जर चालू वर्ष किंवा महिना उलटून गेलेला कोड दिसत असेल तर असा सिलेंडर घेण्यास नकार द्या.