योगाभ्यासामुळे सौंदर्य खुलते. ज्यांना नैसर्गिक सौंदर्य हवे, त्यांनी पुढील पाच योगाभ्यास रोज केलेच पाहिजेत.
स्त्री मन आधीच गुंतागुंतीचं आणि चेहरा मनाचा आरसा! कितीही मेकअप केला पण मनात विषयांचा गुंता असेल तर सौंदर्य खुलणार नाही.
अतिविचार, अतिचिंता कमी करून मन स्थिर करायचे असेल, वयापेक्षा १० वर्ष लहान दिसायचे असेल, तर जागतिक योग दिनाच्या मुहूर्तावर योगाभ्यास सुरु करा.
तणाव, पचनाचे विकार, हॉर्मोनल चेंजेसमुळे त्वचा काळवंडते. नियमित योगाभ्यासाने नैसर्गिक उजळपणा मिळवता येतो आणि सौंदर्य परत आणता येते.
सर्वांगासन : पाठीवर झोपा आणि कंबर, नितंब आणि पाय हाताच्या आधारे वर न्या. दीर्घ श्वसन सुरु ठेवत, सरावाने तीन ते पाच मिनिटं या आसनस्थितीत राहा.
हलासन : सर्वांगासनाचा सराव झाला की भिंतीचा आधार घेत पाय टेकवत कंबरेपासूनचा भाग डोक्याच्या मागच्या बाजूला न्या. तीन ते पाच मिनिटं हा सराव करा.
भुजंगासन : पोटावर झोपून कंबरेपासून छाती आणि चेहऱ्याचा भाग हाताच्या आधारे वर न्या आणि त्या स्थितीत तीन ते पाच मिनिटं थांबा.
कपालभाती : वज्रासन वा सुखासन स्थितीत बसून जलद श्वसन करा. फुप्फुसांना बळकटी मिळेल आणि शरीरातील नसा मोकळ्या होतील.
शवासन : योगाभ्यास झाल्यावर न विसरता दहा मिनिटं शांत स्थितीत शरीर सैल सोडून डोळे बंद करून पाठीवर झोपा आणि श्वसनावर लक्ष द्या.
हे योगाभ्यास तुम्हाला तनाने आणि मनाने सुदृढ ठेवतील. याचा नित्य सराव सुरु केल्यावर तणाव, नैराश्य, राग कुठल्याकुठे पळून जाईल.
याशिवायही योगासनांचे अनेक प्रकार आहेत, मात्र योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या देखरेखीखाली ते करणे केव्हाही चांगले!