लग्नाच्या वरातीसाठी हेलिकॉप्टर बूक करायला किती खर्च येतो?
सध्या हेलिकॉप्टरने नवरदेवाची एन्ट्री हा नवा ट्रेंड लोकप्रिय होतोय.
दिवाळी झाली की लग्नसराईला सुरुवात होते. सध्याच्या काळातील लग्नामध्ये अनेक नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात.
आजकालच्या लग्नात नववूध डान्स करत एन्ट्री घेते, तर काही वेळा नवरदेवही हटके पद्धतीने वरात घेऊन येतो. यामध्येच सध्या हेलिकॉप्टरने नवरदेवाची एन्ट्री हा नवा ट्रेंड लोकप्रिय होतोय.
अनेकांच्या लग्नात नवरदेवाने हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेतल्याचं दिसून आलं. मात्र, हे हेलिकॉप्टर बूक करण्यासाठी किती खर्च येतो हे माहितीये का तुम्हाला?
देशात अनेक कंपन्या हेलिकॉप्टर भाड्याने देतात. यामध्ये बद्री हेलिकॉप्टर, अरिहंत, पवन हंस, एअर चार्टर्स इंडिया , ब्लूहाइट्स एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, आणि अॅक्रेशनएव्हिएशन या कंपन्यांचा समावेश आहे.
लग्नासाठी लागणाऱ्या हेलिकॉप्टरचं भाडं साधारणपणे ५० हजारपासून सुरु होतं. हे भाडं एका तासासाठी असतं. तसंच हेलिकॉप्टरचा आकार, ठिकाणाचं अंतर याप्रमाणे हे भाडं २ लाखापासून १० लाखांपर्यंतही असू शकतं.
हा खर्च फक्त भाड्यापुरता मर्यादित नाही. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी उतरवायचे आहे त्या ठिकाणी लँडिंग साइट तयार करणे आवश्यक असते. सोबतच हेलिकॉप्टर उड्डाण करण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी परवानगी आवश्यक असते.