मुंबई सेंट्रलचे नाव बदलून 'जगन्नाथ शंकरशेठ' यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
देशात पहिली रेल्वे आणण्याचे काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
संस्थात्मक काम हे नाना शंकरशेट यांच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं त्यांचा जीवनप्रवास उलगडताना जाणवत राहतं. त्यांनी स्वत: शिक्षणाचं महत्त्वही जाणलं होतं.
10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाडसारख्या त्या काळात दुर्गम भागात जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म झाला.
वडील शंकरशेट मुरकुटे हे श्रीमंत होते. 1799 च्या टिपू-इंग्रज युद्धात त्यांना अमाप पैसा मिळाला होता.
'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांपैकी नाना शंकरशेट हे एक होते.
1841 साली ते बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या मंडळावर गेले. तिथं सतत 16 वर्षे ते निवडून आले. 1845 साली नानांच्या सहकार्यानं ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.
ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, त्या काळात त्यांचे हे प्रयत्न होते. महिलांसाठी त्यांनी प्रसंगी समाजाचा रोषही पत्कारला.
नाना शंकरशेट यांची राजकीय सक्रियताही प्रभावी राहिली. 1861 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नानांना स्थान मिळालं.
1862 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागर म्हणूनही नियुक्त झाले.
बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांनी योगदान दिलंय.
31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेट यांचं निधन झालं. आयुष्यातील अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी संस्थात्मक कामातून मुंबईच्या विकासाचा पाया रचला.