महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज एका विमान अपघातात निधन झाले आहे.
राज्यातील इतका मोठा नेता गमावणे म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. राजकीय वर्तुळात ही अत्यंत दुःखद बातमी असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती येथे प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते.
२२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार मुंबईत आले. मुंबईत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला गेले.
अजित पवारांनी एकूण सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती.
पवार कुटुंबातील असल्यामुळे राजकारणात प्रवेश त्यांच्यासाठी तुलनेने सोपा होता, मात्र त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९८२ मध्ये त्यांनी साखर सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सुमारे १६ वर्षे काम केले.
१९९१ नंतर ते अनेक वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची लोकसभा सदस्य म्हणूनही निवड झाली होती.
अजित पवार एकूण सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले असून, विविध सरकारांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर काम केले.