हॉटेल कामगार ते मराठा समाजाचा बुलंद आवाज, जरांगे यांचे शिक्षण किती?
चला तर मग जाणून घेऊया जरांगे यांच्याबद्दल...
मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात केंद्रस्थानी राहिला आहे. या आंदोलनाला धारदार दिशा देणारे नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील.
आंतरवाली सराटीतून सुरु केलेलं मराठा आंदोलन हे आज २९ ऑगस्ट २०२५ रोजी थेट मुंबईतून सुरू झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी समाजासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे.
त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. ते त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात. मराठा समाजाच्या चळवळीसाठी त्यांनी स्वतःच्या मालकीची काही जमीनही विकल्याचं बोललं जातं.
मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण हे बारावीपर्यंत झालं आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आपल्या शिक्षणावर भाष्य केलं होतं.
मनोज जरांगे पाटील यांनी बारावीनंतर शिक्षण सोडलं. त्यानंतर ते आरक्षणाच्या चळवळीत सामील झाले. दुसरीकडे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्येही काम केलं.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मनोज जरांगे यांचा शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजाची उन्नती होऊ शकते, या विचारावर ठाम विश्वास आहे.
आता मराठा समाजासाठी पुन्हा ते मैदानात उतरले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जर आरक्षण मिळाले तर मराठा विद्यार्थ्यांना चांगले आणि कमी शुल्कात शिक्षण मिळेल, असं त्यांचं मत आहे.
त्यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता सरकार दिलेल्या मुदतीत काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.