मॅकिन्से अँड कंपनीच्या 'वर्कप्लेस वुमन' अहवालात धक्कादायक माहिती
भारतातील कंपन्यांमध्ये अजूनही पुरुषांच्या तुलनेत महिलांना नोकरीची संधी, सन्मानजनक पद, पगार मिळत नसल्याचे आढळून आले आहे.
खासगी क्षेत्रात, तीन कामगारांत केवळ एक महिला असून, व्यवस्थापकीयस्तरीय पदांपैकी फक्त २४ टक्के पदे महिलांकडे आहेत.
नोकरी मिळण्यापासून, पगार ते वरिष्ठ म्हणून पद मिळवताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, असे मॅकिन्से अँड कंपनीच्या 'वर्कप्लेस वुमन' अहवालातून समोर आले आहे.
अहवालानुसार, भारतातील विद्यापीठ पदवीधरांच्या संख्येपैकी निम्म्या मुली असूनही, नोकरी मिळवताना, नोकरीत प्रगती करताना आणि नोकरी टिकवून ठेवण्यात महिलांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे.
हा अहवाल भारतासह इतर देशांतील ३२४ कंपन्यांच्या निष्कर्षावर आधारित आहे. कंपनीत सर्वोच्च कार्यकारी पदे मिळण्याचे प्रमाण केनिया, नायजेरिया यांच्या तुलनेत भारतात केवळ १३ टक्के इतकेच आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, महिलांना पुरुषांच्या तुलनेत २८ टक्के पगार कमी मिळत आहे.
४३ टक्के महिलांना ऑफिस काम आमि घरातील काम यात समतोल साधणं अवघड झाले आहे. तर ५९ टक्के महिलांना कार्यालयात लिंगभेद केल्याचा अनुभव आला आहे.
अहवालात म्हटले आहे की, भारतातील ८३ टक्के महिलांना पुरुषांपेक्षा स्वतःला जास्त सिद्ध करावे लागत आहे. त्याचबरोबर त्यांचबरोबर ६९ टक्के महिलांचं म्हणणं आहे की, त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं जात आहे.