अजित पवार यांचा आज हा ६६ वा वाढदिवस आहे. स्पष्ट वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आजवर अनेकांची शाळा घेतली आहे.
पण याच अजित पवारांचं नेमकं शिक्षण किती झालंय, याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
महाराष्ट्राचे राजकारण क्षणात फिरवणाऱ्या अजित पवारांचे शिक्षण बारामतीमधील बालविकास मंदिरमध्ये झाले. त्यानंतर ते दहावीसाठी मुंबईला आले.
मुंबईतील विल्सन कॉलेज गिरगावमधून त्यांनी दहावीसाठी प्रवेश घेतला. पण, दहावीमध्ये अजित पवार एका विषयात नापास झाले. त्यांचा एक विषय राहिला. पण, पुढच्या वर्षी त्यांनी तो विषय काढला.
त्यानंतर त्यांनी ११ वीसाठी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवार यांनी अभ्यासात फार हुशार नसल्यानं गॅप घेतल्याचं सांगितलं होतं.
याच मुलाखतीध्ये ते म्हणाले होते "मी बी.कॉमला प्रवेश घेतला. शेवटचं एक सत्र बाकी असल्यामुळे मला बी. कॉमची पदवी मिळाली नाही".
पुढे त्यांनी सांगितलं की, म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरताना मला शिक्षण किती या कॉलममध्ये बी. कॉम लिहिता येत नाही"
ते म्हणाले, "मग आपल्याला १२ वीच शिक्षण लिहावे लागते. त्यामुळे माझा फॉर्म भरताना मी केव्हाच बी. कॉम किंवा पदवीधर लावत नाही"
याचा अर्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ वी पास आहेत.
अजित पवार यांचे शिक्षण मर्यादित असले तरी, त्यांच्या कर्तृत्वाने आणि सामाजिक बांधिलकीने ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात.