जिवंत नाग पूजेमुळे जग प्रसिद्ध झालेल्या शिराळच्या नागपंचमीवर २००२ पासून न्यायालयाची बंधने आली.
दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले.
त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला, या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नाग पूजेचे कारण सांगितले.
त्यावेळी मातीच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का, असे विचारताच तिने होकार दिला.
तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली होती. येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात.
त्याचा उपवास करतात.तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे, तळणे वर्ज्य केले जाते.
२००२ पासून शिराळच्या जिवंत नाग पूजेवर बंदी घालण्यात आली. त्यापूर्वी प्रथम नागांची अंबामाता मंदिरात नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढली जात होती.
आत्ता न्यायालयाने बंधने घातल्याने जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जात आहे.
पूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती.