विकतपेक्षा भारी केळी-बटाटा वेफर्स घरी करण्याची भारी पद्धत
केळी आणि बटाटा वेफर्स करा आता घरीच. कमी तेलकट आणि चव एकदम भारी. पाहा कसे करायचे.
वेफर्स हा पदार्थ एकदा खायला लागल्यावर जिभेला चटक लागते. पोट नको म्हणाले तरी जिभेची मागणी काय थांबत नाही. पण विकतचे तेलकट किती खावे याला मर्यादा असणे फार गरजेचे.
घरी बटाटा आणि केळ्याचे वेफर्स करणे सोपे आहे. अगदी विकत सारखे होतात. फक्त काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायच्या.
बटाटा वेफर्स करताना बटाट्याचे पातळ काप केल्यावर ते पाण्यात भिजत ठेवायचे. नंतर कोरड्या फडक्याने पुसायचे. त्याचे पाणी काढून टाकायचे आणि मग तळायचे.
वेफर्स तळताना तेल कडक तापवून घ्यायचे आणि मग गॅस कमी करायचा. गॅस कमी केल्यावर त्यात बटाटा सोडायचा आणि मंद आचेवर तळायचे. गॅस फुल ठेवला तर चांगले होत नाहीत.
केळा वेफर्स तळण्यासाठी खोबरेल तेल वापरायचे. तरच केळा वेफर्स विकतचे जसे चवीला असतात तसे लागतील. साध्या इतर कोणत्याही तेलात तळल्यास चव वेगळी लागते.
केळीचे काप तेलात सोडल्यावर गॅस मंद ठेवायचा आणि त्यात मीठ आणि हळदीचे पाणी घालायचे. अगदी दोन चमचे पाणी पुरे होते. वेफर्स मस्त पिवळे होतात.
बटाटा आणि केळीचे दोन्ही वेफर्स अर्धे तळायचे. काढायचे आणि मग पुन्हा एकदा तळायचे. असे केल्याने मस्त कुरकुरीत होतात.
विकतचे वेफर्स आणण्यापेक्षा घरी असे वेफर्स करणे अगदी सोपे आहे. शिवाय तेलही घरचे चांगले असते. विकतच्या तेलाचा काही भरवसा देता येत नाही.