आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत मेदूवडा करायची सोपी पद्धत. पाहा टिप्स.
नाश्त्याला खाल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पदार्थांपैकी एक म्हणजे मेदूवडा. सगळीकडे हा पदार्थ उपलब्ध आहे. मुळात स्वस्तात मस्त काम म्हणून लोकं आवडीने खातात.
मेदूवडा तयार करणे मात्र एक कलाच आहे. योग्य असा गोलाकार भोक असलेला वडा सगळ्यांनाच जमत नाही.
काही साध्या टिप्स लक्षात ठेवा आणि विकतपेक्षा मस्त एकदम साऊथ स्टाईल मेदूवडा घरीच करा.
पीठ वाटताना त्यात पाणी घातल्यावर त्याला आकार देणे कठीण जाते. त्यामुळे धान्ये भिजवताना जेवढे पाणी घेतले त्याच पाण्यात पीठ वाटायचे. जास्तीचे पाणी नकोच.
किमान दहा मिनिटांसाठी पीठ फेटणे गरजेचे असते. पीठ छान भिजले प्रमाण योग्य असले तरी ते फेटले नाही तर वडा छान खमंग होत नाही.
पीठ तयार करताना अनेक जण मीठ घालतात. मात्र तसे न करता अगदी तळणी ठेवल्यावर पिठात मीठ घालायचे. म्हणजे पीठ सैलसर होत नाही.
हाताला पाणी लावायचे आणि मग हातावर पीठ घेऊन अंगठ्याने भोक पाडत वडा तळणीत सोडायचा. त्यासाठी पीठ घट्ट असणे गरजेचे आहे.
वडा तळताना गॅस मंद ठेवायचा. मोठा ठेवल्यास करपेल तसेच कुरकुरीत न राहता, तळून काढल्यावर तो लगेच मऊ पडतो.