चटणी करायच्या अनेक प्रकारांपैकी एक चविष्ट रेसिपी पाहा आणि नक्की करा.
चटणी हा पदार्थ ताटात असला की जेवणाची रंगत वाढते. विविध प्रकारच्या चटणी करता येतात. सगळ्याच चवीला छान आणि जरा हटके असतात.
इडली, आंबोळी अशा पदार्थांसोबत डाळं घातलेली चटणी एकदम मस्त लागते. करायला अगदी सोपी आहे.
वाटीभर डाळं घेतलं तर वाटीभर नारळ घ्यायचा. छान ताजा नारळ घ्या. त्यात दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घाला.
आल्याचा तुकडा घाला आणि लसणाच्या काही पाकळ्या सोलून त्यात घाला. लसूण जास्त घेऊ नका. तिची चव फार उग्र लागेल.
थोडी कोथिंबीर घाला आणि दोन ते चार चमचे दही घाला. सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि वाटून घ्या. वाटताना त्यात थोडे पाणी घाला.
एका फोडणीपात्रास थोडे तेल घ्या. त्यात मोहरी घाला, जिरे घाला आणि कडीपत्ता घाला. फोडणी तडतडली की गॅस बंद करा आणि मग त्यात चमचाभर तिखट घाला थोडी हळद घाला.
फोडणी चटणीवर ओता आणि चवी पुरते मीठ घाला. चटणी मस्त एकजीव करुन घ्या. चवीला एकदम भारी लागते. नक्की करुन पाहा.