Join us  

Coronavirus: कोरोनाचा उद्रेक! सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचं दार पुन्हा होणार बंद?; रेल्वेकडून स्पष्टीकरण

By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 9:38 AM

1 / 10
मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत होतं, परंतु आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या ठाकरे सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
2 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) लोकांना आवाहन करताना पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या, कोरोना संपुष्टात आल्यासारखं वागू नका, अद्यापही कोरोनाचं संकट टळलं नाही, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
3 / 10
यातच बुधवारी दिवसभरात ४ हजार ७०० हून अधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत, यावर्षीची ही सर्वात मोठी संख्या आहे. राज्यात सध्या ३८ हजारांहून अधिक लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. सलग आठव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या ३ हजाराहून अधिक आहे.
4 / 10
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे, कोरोना रुग्णवाढीसाठी मुंबईच्या लोकल सेवेला(Mumbai Local Service) जबाबदार धरलं जात आहे, मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना निर्धारित वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे, दिवसाला ४० लाखाहून अधिक प्रवाशी लोकलचा प्रवास करतात.
5 / 10
मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसून येत आहे. बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, विक्रोळी या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून काही भाग हॉटस्पॉट ठरले आहेत. लोकल ट्रेनमधील गर्दीत सोशल डिस्टेंसिंगचं पालन होत नाही, तसेच अनेकजण मास्क न घालता आढळतात, त्यामुळे कोरोना रुग्णवाढीला लोकलमधील गर्दी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.
6 / 10
दरम्यान, लोकल सेवा पुन्हा बंद करण्यात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे, मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. प्रवाशांनी मास्क घालावा यासाठी रेल्वे आणि महापालिकेकडून संयुक्तरित्या जगजागृती आणि कारवाई सुरू आहे. तसेच रेल्वेने अवैधपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली आहे.
7 / 10
मागील ११ महिने बंद असलेल्या लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी काही अटींवर खुली करण्यात आली, मर्यादित वेळा देऊन सर्वसामान्य लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली, १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल सुरु करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय त्यामुळे महापालिका प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरही जनजागरूकता करण्यास सुरूवात केली आहे.
8 / 10
सध्या सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येतो. म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येत नाही.
9 / 10
लोकल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत लॉकडाऊन करण्याची वेळ येईल असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दिला तर मास्क लावण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी बुधवारी रेल्वेने प्रवास केला.
10 / 10
महापौरांनी बुधवारी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रूझ स्टेशनपर्यंत धिम्या गतीच्या लोकलने प्रवास करीत स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईतील काही विभागांमध्ये कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये अधिक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या पाहणीत लोकलमध्ये ९० टक्के लोकांनी मास्क घातले होते, तर १० टक्के लोकांनी मास्क घातले नसल्याचे आढळून आले असे महापौरांनी सांगितले.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai Localमुंबई लोकलcorona virusकोरोना वायरस बातम्या