Join us

म्हाडाच्या ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद, १७३ दुकानांच्या यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र 

By सचिन लुंगसे | Updated: July 9, 2024 20:07 IST

Mumbai News - म्हाडा मुंबई मंडळातर्फे विविध वसाहतींमधील १७३ दुकानांच्या विक्रीसाठी राबविलेल्या ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार आहे. बोलीच्या दहा टक्के रक्कम अदा केल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्याकरिता अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्र घेता येणार आहे.

मुंबई - म्हाडामुंबई मंडळातर्फे विविध वसाहतींमधील १७३ दुकानांच्या विक्रीसाठी राबविलेल्या ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार आहे. बोलीच्या दहा टक्के रक्कम अदा केल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्याकरिता अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्र घेता येणार आहे. बोलीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना मंडळाद्वारे वाटपपत्र व दुकानांचा ताबा देण्यात येणार असून, ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे आणि गोरेगावमधील बिंबीसार नगर येथील एका दुकानाला १३.९४ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे.

ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांच्या स्वीकृतीसाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला. मुंबई मंडळातर्फे १७३ दुकानांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी १ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. निकाल २८ जून रोजी जाहीर झाला. त्यानुषंगाने ११२ दुकानांकरिता ६०४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करत लिलावात बोली लावली. ६१ दुकानांना अर्जदारांचा शून्य प्रतिसाद मिळाला. मंडळातर्फे ११२ दुकानांसाठी ९७.७४ कोटी रुपये बोली निश्चित करण्यात आली होती. या लिलावात ११२ दुकानांसाठी अर्जदारांनी १७१.३८ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. ई-लिलावामध्ये एका दुकानाला १३.९४ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली.  

टॅग्स :म्हाडामुंबई